Tuesday, Jan 23rd

Headlines:

वाहतूक नियंत्रणासाठी ‘कॅनव्हास मिरर’

E-mail Print PDF

मालवण : अरुंद रस्त्यामुळे वारंवार होणारी वाहतुकीची कोंडी आणि त्यात रस्त्यालगत वाढलेली झाडीमुळे पर्यटनाचे केंद्रबिंदू असलेल्या देवबागमध्ये येणाऱया पर्यटकांना त्रासदायक प्रवास करावा लागत होता. रस्ता रुंदीकरणाची शक्यता तूर्त तरी कमी असल्याने वाहन चालकांना सोयीसाठी निर्मल सागर तट अभियानांतर्गत देवबाग ग्रामपंचायतीने या मार्गावर दहा ठिकाणी ‘कॅनव्हास मिरर’ बसविले आहेत. हे मिरर बसविण्यासाठी ग्रामसेवक युवराज चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले होते.
वारंवार पाठपुरावा करुनही बांधकाम विभागाकडून रस्त्यालगत वाढलेली झाडी साफ न केल्याने ग्रामस्थांनी श्रमदानातून झाडी साफ केली होती. मात्र, रस्त्याला अनेक ठिकाणी वळणे असल्याने पर्यटकांना समोरुन येणाऱया वाहनांचा अंदाज येत नसल्याने अपघात व वाहतुकीची कोंडीची समस्या निर्माण होत होती. या समस्या टाळण्यासाठी देवबाग ग्रा. पं.ने रस्त्यावर दहा ठिकाणी मिरर बसविले आहेत.
देवबाग मधील रस्ते अरुंद आहेत. यामुळे निर्मल सागरतट अभियान राबविताना उपलब्ध झालेल्या निधीतून हे मिरर बसविण्यात आले. या मिररचे उद्घाटन उद्घाटन काशिनाथ केळुसकर व रमेश कद्रेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच तमास फर्नांडिस, नवनिर्वाचित सरपंच जान्हवी खोबरेकर, माजी सरपंच उल्हास तांडेल, ग्रामसेवक युवराज चव्हाण, प्रादेशिक बंदर अधिकारी श्री. टोपणो, पं. स. सदस्या मधुरा चोपडेकर, मनोज खोबरेकर, भानुदास येरागी, रमेश कद्रेकर, बंदर अधिकारी अनंत गोसावी उपस्थित होते. बहिर्गोल मिरर स्टेनलेस स्टीलमध्ये बनवले जातात. वाहतूक आणि वाहतुकीसाठी बाहेरील भागाची माहिती चालकांना उपयुक्त असते. अचूक रहदारीचे आणि उच्च दृश्यमानता असणारे हे मिरर आहेत. या मिररमुळे वाहने कशी जात आहेत, याची माहिती समोरील वाहनचालकांना मिळते. या मिररमुळे वाहन चालकाला डाव्या आणि उजव्या या दोन्ही बाजूंना पाहता येते. त्यामुळे भविष्यात देवबाग येथील अपघात व वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे.