Wednesday, Feb 21st

Headlines:

आम्ही शिवसैनिक आझाद मैदानावरील धरणे आंदोलनात प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने सहभागी होणार:- आमदार राजन साळवी

E-mail Print PDF
राजापूर तालुक्यातील नाणार सह अन्य १४ गावांमध्ये होऊ घातलेल्या केंद्र सरकारच्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला येथील स्थानिक जनतेचा विरोध असून स्थानिक जनतेबरोबर शिवसेना शेवटपर्यंत राहणार असल्याची भूमिका *शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे* ह्यांनी ह्यापुर्वीच जाहीर केली असून स्थानिक आमदार ह्या नात्याने मी पहिल्या दिवसापासून स्थानिक जनतेसोबत आहे त्यामुळे ह्या प्रकल्पाविरोधात उद्या दि. *८ डिसेंबर* रोजी मुंबई येथील *आझाद मैदान* येथे प्रकल्पविरोधी संघर्ष समितीने छेडलेल्या धरणे आंदोलनामध्ये आम्ही शिवसैनिक *खासदार विनायकजी राऊत* ह्यांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त संख्येने प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने सहभागी होणार असून प्रकल्पविरोधी संघर्ष समितीकडून आपल्याला तश्या प्रकारचे अधिकृत निमंत्रण देखील आले असल्याचे *आमदार राजन साळवी* ह्यांनी म्हटले आहे. रिफायनरी प्रकल्पाला आपला ठाम विरोध असल्याचे सांगत *आमदार राजन साळवी* पुढे म्हणाले की, नुकत्याच प्रकल्पाच्या बाबतीत झालेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे *मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस* ह्यांचेसमोर देखील मी स्वतः व जिल्ह्याचे *पालकमंत्री मा. ना. रविंद्रजी वायकर* तसेच महाराष्ट्र राज्याचे *उद्योगमंत्री मा. ना. सुभाषजी देसाई* ह्यांनी ह्या प्रकल्पाला स्थानिक जनतेचा विरोध असल्याने प्रकल्प रद्द करावा अशी भूमिका मांडली होती. ह्या बैठकीमध्ये प्रकल्पविरोधी संघर्ष समितीचे सन्माननीय सदस्य देखील उपस्थित होते. आम्ही त्यांच्यासमोर मांडलेल्या आमच्या भूमिकेचे प्रकल्पविरोधी संघर्ष समितीने स्वागत केले असून संघर्ष समितीचा शिवसेनेवर ठाम विश्वास असल्याचे संघर्ष समितीकडून आपणास सांगितले आहे. तसेच ह्यापुढे देखील भविष्यात ह्या प्रकल्पाच्या विरोधात प्रकल्पवरोधी संघर्ष समितीकडून ज्या ज्या वेळी ज्या ज्या प्रकारची आंदोलने, उपोषणे छेडण्यात येतील त्या सर्व आंदोलनात, उपोषणात शिवसेना पक्ष आणि स्थानिक आमदार ह्या नात्याने मी स्वतः तसेच *खासदार विनायकजी राऊत* व तमाम शिवसैनिक उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन प्रकल्पग्रस्तांच्या भूमिकेला पाठिंबा देतील, असे *आमदार राजन साळवी* ह्यांनी म्हटले आहे. प्रकल्पविरोधी *संघर्ष समितीचे अध्यक्ष मा. अशोकजी वालम* ह्यांचेसोबत आपली चर्चा झाली असून *अशोक वालम* ह्यांनी भविष्यात होणाऱ्या प्रत्येक आंदोलनामध्ये किंवा उपोषणामध्ये शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक हे निमंत्रीतच असतील व शिवसेनेला सोबत घेऊनच भविष्यात संघर्ष समिती ह्या प्रकल्पाच्या विरोधात लढा उभा करून शेवटपर्यंत लढेल असे सांगितल्याचे *आमदार राजन साळवी* ह्यांनी म्हटले आहे. राजापूर तालुक्यातील मुंबईस्थित तमाम राजापूरवासिय तसेच कोकणातील मुंबईस्थित तमाम शिवसैनिकांनी दि. ८ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे उपस्थित राहून धरणे आंदोलन यशस्वी करण्यास व सरकारला हा प्रकल्प रद्द करण्यास भाग पाडण्यात हातभार लावावा, असे जाहीर आवाहन *आमदार राजन साळवी* ह्यांनी केले आहे.