Thursday, Feb 22nd

Headlines:

ओखी वादळामुळे मोहोर गळला, मच्छिमारांचे कोट्यावधींचे नुकसान

E-mail Print PDF
रत्नागिरी- ‘ओक्खी’ चक्रीवादळामुळे किनारपट्टीवरील करोडोंची उलाढाल होणारा मत्स्य व्यवसाय गेल्या ५ दिवसांपासून ठप्प झाला आहे. वादळाची तीव्रता ६ डिसेंबर रोजी जरी कमी झालेली असली तरी हवामान खात्याकडून पुढील निर्देश येईपर्यंत मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन मत्स्य विभागाने केले आहे. परिणाम वादळामुळे सुमारे २० कोटी रुपयांचे नुकसान या व्यवसायाचे झाल्याचे सांगण्यात येत आहे.
‘ओक्खी’ चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवरील सर्व बंदरामध्ये लाल बावटा लावण्यात आला आहे. समुद्रात तुफान आल्याने प्रचंड उधाण आले आहे. त्यामुळे समुद्रात गेलेल्या मच्छिमारांनी आपल्या नौका प्रशासनाचा वादळाविषयी इशारा मिळताच किनारा गाठला. मासेमारीसाठी गेलेल्या नौका तत्काळ जवळच्या बंदरांच्या आश्रयाला गेल्या. रत्नागिरी जिल्हयाच्या किनारपट्टीवर हजारो नौका आजमितीस विविध ठिकाणच्या बंदरांच्या आश्रयालाच राहिलेल्या दिसून येत आहेत. त्यामध्ये स्थानिक नैकांसह परजिल्ह्यातील, परराज्यातील शेकडो नौकांचा समावेश आहे.
गेले पाच दिवसांपासून किनारपट्टीवरील मच्छिमारी व्यवसाय थांबला आहे. जिल्हयातील सुमारे २ हजार ५०० नौका बंदरात नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. गेल्या पाच दिवसांपासून या नौकांना समुद्रात नेण्यास मच्छीमारही धजावलेले नाहीत. प्रत्येक बंदरामध्ये प्रशासनाने या नौकांवर नजर राखण्यासाठी यंत्रणा कार्यरत ठेवली आहे. वादळ काळात दरदिवशी बंदरावरील हालचालींचा आढावा प्रशासनामार्फत घेण्यात येत आहे. जेणेकरून मच्छिमारांवर कोणतीही आपत्ती ओढवू नये, यासाठीही वारंवार मच्छिमारांना सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हयातील बंदरांमध्ये दरदिवसाला सुमारे ३५०० ते ४ कोटींची उलाढाल या व्यवसायातून होत असते. मात्र वादळामुळे गेल्या पाच दिवसात सुमारे २० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज येथील सहाय्यक मत्स्य आयुक्त विभागाच्या सूत्रांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
ओखी वादळ आणि अवकाळी पडलेला नाशा पाऊस यामुळे कोकणातील दोन महत्वाचे व्यवसाय म्हणजे आंबा आणि मत्स्य व्यवसाय धोक्यात येवून ओखी वादळाचा या दोन्ही व्यवसायांना मोठा फटका बसल्याने आंबा उत्पादक शेतकरी तसेच मच्छिमार बांधव पुरता हवालदिल झाला आहे. गेल्या पाच दिवसात मत्स्यउत्पादन ठप्प झाल्याने २० कोटी रुपयांचे नुकसान झाले असून आंबा उत्पादक शेतकरी देखील या संकटात सापडल्याने फवारणीवर केलेल्या लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.