Thursday, Feb 22nd

Headlines:

एक्सरे केंद्राला सील ठोकले, ८ जणांना नोटीसा

E-mail Print PDF
चिपळूण, प्रतिनिधी ः एक्सरे मशीन बसवण्यासाठी घालून देण्यात आलेल्या मानकांचे पालन न केल्यामुळे रत्नागिरी जिह्यातील एका एक्सरे केंद्राला सील ठोकण्यात आले असून अन्य ८ केंद्रांना सील का ठोकण्यात येऊ नये? अशी नोटीस अणुऊर्जा नियामक मंडळाने जारी केली आहे. यामध्ये कामथे-चिपळूण येथील उपजिल्हा रुग्णालयाचा समावेश आहे, असे अणुऊर्जा नियामक मंडळाचे अधिकारी डी. एम. राणे यांनी सांगितले.
ते म्हणाले, रत्नागिरी जिह्यातील खेड येथील रतनबाई घरडा हॉस्पिटल, चिपळूणचे एसएमएस हॉस्पिटल चिपळूण, एसव्ही डायग्नोस्टीक सेंटर, आदित्य आर्थोपेडीक ऍण्ड आय केअर सेंटर, मोडक हॉस्पिटल, स्कीन केअर क्लिनिक, चिपळूण-कामथे येथील उपजिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथील निष्कर्ष डायग्नोस्टीक सेंटर या ८ केंद्रांनी मानकांची पूर्तता न केल्याचा ठपका ठेवून अणुऊर्जा नियामक मंडळाने सील का ठोकू नये, अशी नोटीस जारी केली आहे.
चिपळूणच्या डॉ. पुजारी यांच्या कोकण डायग्नोस्टीक सेंटरने परवाना न घेता व्यवसाय सुरु केल्याचा आक्षेप घेऊन ताबडतोब सील करण्यात आले, अशी माहिती मंडळाच्या अधिकाऱयांनी दिली. रत्नागिरी जिह्यात विविध ठिकाणी एक्सरे केंद्रांची तपासणी अणुऊर्जा नियामक मंडळाकडून सुरु आहे.
अधिकाऱयांनी सांगितले की, प्रत्येक केंद्राने परवाना घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय आमचे तपासणी पथक तज्ञ ऑपरेटरची तपासणी करते. खोलीची जागा, टीएलडी म्हणजे विकिरण मापन साधन, विशिष्ट स्वरुपाचा ऍप्रन, विशिष्ट दरवाजे, खोलीच्या भिंती यांची तपासणी होते. एक्सरे यंत्रणा उभारलेल्या खोलीच्या भिंती किमान ९ इंच रुंदीच्या असणे आवश्यक ठरवण्यात आले आहे.