Thursday, Feb 22nd

Headlines:

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यता

मुंबई -माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी नव्याने स्थापन केलेल्या ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्षा’ला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. पक्षाची नोंदणी केल्याबाबतचे प्रमाणपत्र कालच प्राप्त झाले. दरम्यान, पक्षाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आता पक्षाचा अधिकृत ध्वजही लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले. काँग्रेसमुक्त झाल्यानंतर राणे यांनी ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची घोषणा केली होती. त्याचवेळी त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पक्ष नोंदणीसाठी अर्जही सादर केला होता. पक्ष नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून आयोगाने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला मान्यता दिल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करताना राणे यांनी आपण लवकरच राज्याचा दौरा करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र पक्ष नोंदणीची प्रक्रिया सुरू असल्याने त्यांचे राज्यव्यापी दौरे सुरू झाले नव्हते. निवडणूक आयोगाकडे पक्षाची नोंदणी झाल्यानंतर लवकरच ध्वजही जाहीर केला जाणार असून त्यानंतर राणे आपला राज्याचा दौरा करणार आहेत. त्याचाच भाग म्हणून येत्या ८ ते १० डिसेंबर दरम्यान ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौ-यावर जाणार आहेत. आता राज्यभरात दौरे, बैठका व सभा घेऊन सभासद नोंदणीचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.