Tuesday, Jan 23rd

Headlines:

वेेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय झेप!

E-mail Print PDF
गुहागर (प्रतिनिधी) - ब्राझीलमध्ये नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात विद्या प्रसारक मंडळाच्या वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयातील साहील कदम व ऋषिकेश भावे या दोन विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पास विशेष मानांकनाचा प्रकल्प म्हणून पुरस्कार मिळाला.
ब्राझीलमधील नामांकित आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन भरवणारी शैक्षणिक संस्थेंतर्गत गेल्या ३२ वर्षापासून आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन भरवले जाते. या विज्ञान प्रदर्शनात दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया, कझाकिस्तान, अर्जेटिना, पेरू, जर्मनी अशा वीस देशांचे मिळून ७००हून अधिक प्रकल्प प्रदर्शित करण्यात आले होते. हे विज्ञान प्रदर्शन शालेय, पदविका व पदवी अशा विविध स्तरावर घेण्यात आले. प्रकल्पाची अचूकता व गुण वैशिष्टये जाणून घेण्यासाठी पाच तज्ञांच्या समितीद्वारे मूल्यमापन करण्यात आले.
विज्ञान प्रदर्शनात महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयातील या दोन विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्राला उपयुक्त ठरणारे ‘ऍग्रीकल्चर विड रिमुव्हर’ हे यंत्र तयार केले. भारतात विशेषतः महाराष्ट्रात शेती करताना शेतमजुरांची समस्या मोठया प्रमाणात भेडसावते. त्यामुळे मळणी, कापणी, खुरपणी यांसारख्या क्रियांचे यांत्रिकीकरण होणे आवश्यक आहे. ही गरज ओळखून यांत्रिक पद्धतीने बागायती, शेतीमधील वाढलेल्या तणांची कापणी तसेच जमीन भुसभुशीत करण्यासाठी या यंत्राची निर्मिती केली गेली आहे. हे यंत्र पूर्णतः महाविद्यालयात बनवण्यात आले असून जवळपासच्या शेतकऱयांच्या भातशेतीत त्याचे प्रात्याक्षिक करून पाहण्यात आले होते. या प्रकल्पामुळे निश्चितच शेतीसाठी मानवी संसाधन अत्यंत अल्प प्रमाणात लागणार आहे.
पुरस्कार प्राप्त विद्यार्थी साहील कदम व ऋषिकेश भावे यांनी विद्यार्थीदशेतच आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात देशाचे नेतृत्व करण्याचा मान आम्हाला मिळाला. याचाच आम्हाला अभिमान वाटतो, असे उद्गार पत्रकार परिषदेत काढले.