Thursday, Feb 22nd

Headlines:

कर्नाळा अभयारण्यात परदेशी पाहुणे

E-mail Print PDF
नवीन पनवेल - पनवेलपासून १२ किलोमीटर अंतरावर कर्नाळा पक्षी अभयारण्यात परदेशी पक्ष्यांचे आगमन झाले आहे. यात पिंटेल डक, ककू, राईनेक, ब्ल्यू रॉक थ्रश, ट्रीपीपीट यांचा समावेश आहे. हिवाळ्यात या ठिकाणी येणार्‍या परदेशी पक्ष्यांची संख्या मोठी असते.
पिंटेल डक हा पक्षी युरोप, आशिया आणि अमेरिका खंडाच्या उत्तरेकडील भागात आढळतो. थंडीच्या हंगामात दक्षिणेकडे स्थलांतर करतो. ककू हा पक्षीसुद्धा युरोपातून या काळात स्थलांतर करतो. कीटक आणि अळ्या हे त्यांचे मुख्य खाद्य आहे. विणीचा हंगाम असल्यामुळे हे पक्षी अंडी देण्यासाठी या भागात स्थालांतरण करतात. व्रईनेक हा पक्षी युरोप आणि आशिया खंडात आढळतो.
ब्ल्यू रॉक थ्रश हा पक्षी युरोपातील दक्षिणेकडील भागात, उत्तर आफ्रिका, चीनच्या उत्तर भागात आढळतो. ब्ल्यू रॉक थ्रश दिवसाला तीन ते पाच अंडी घालतो. कीटक आणि छोटे सरपटणारे प्राणी हे त्यांचे मुख्य खाद्य आहे. ट्रीपीपीट हा पक्षी दिसायला चिमणीसारखा दिसतो. युरोप आणि मध्य आशिया खंडांत ट्रीपीपीट आढळतो. साधारणपणे दरवर्षी दोनदा हे सर्व पक्षी येथे स्थलांतर करतात. मध्य आशिया, युरोप, उझ्बेकिस्तान, सायबेरियातून हे पक्षी येथे येतात. कर्नाळा अभयारण्यात सदाहरित, खारफुटी तसेच पानगळीची वने आढळतात. यात विविध प्रकारच्या ६०० वृक्षांच्या जाती अस्तित्त्वात आहेत. त्यामुळे पक्ष्यांना लागणारे विविध प्रकारचे खाद्य येथे उपलब्ध होते.