Tuesday, Jan 23rd

Headlines:

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक लोकार्पण सोहळ्याला प्रारंभ

E-mail Print PDF
राजापूर (प्रतिनिधी) - राजापूर शहराचा मानबिंदू ठरलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळयाला मंगळवारी झोकात प्रारंभ करण्यात आला. गिरनार, रामेश्वरम सह काशी, गंगा, जमुना, नर्मदा, कृष्णा, राजापूरची गंगा आदी जलाने शिवछत्रपती महाराजांच्या मूर्तीला मांगल्यस्नान घालण्यात आले. आज बुधवारी शिवस्मारकाचा लोकार्पण सोहळा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याहस्ते करण्यात येणार आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या राजापूर नगरीत आज बुधवारी सकाळी १० वाजता शिवस्मारकाचा लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे. या सोहळयाची शिवस्मारकाला सुवासिक जलाने मांगल्यस्नान घालून खऱया अर्थाने सुरूवात करण्यात आली. या मांगल्यस्नानासाठी काशी, गंगा, यमुना, सरस्वती, वरूणा, नर्मदा, कृष्णा, गोमती, गिरनार, रामेश्वरम, अयोध्येत प्रभू श्रीराम बंधू भरत ज्या विहिरीवर स्नान करत होते, त्या विहिरीचे जल, राजापूरचे गंगाजल, प्रयागक्षेत्र आणि रामेश्वरमधील समुद्रतीर्थ तसेच त्या मंदिरातील २२ कुंडांमधील गोडया पाण्याचे तीर्थ आदी तिर्थांचा समावेश करण्यात आला होता.
मंगळवारी सकाळी ७.३० वाजता शिवछत्रपतींच्या मूर्तीला सुवासिक पवित्र जलाने स्नान घालण्यात आले. हे शिवमांगल्य स्नान व समंत्रक पंचामृत अभिषेक आमदार राजन साळवी व त्यांच्या पत्नी अनुजा साळवी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी संपर्कप्रमुख चंद्रप्रकाश ऊर्फ बबन नकाशे, शहरप्रमुख संजय पवार, अनिल कुडाळी, शिवस्मारक वास्तू जीर्णोध्दार समितीचे अध्यक्ष महेश शिवलकर, राजाभाऊ रसाळ, शिवसेना उपतालुकाप्रमुख रामचंद्र तथा तात्या सरवणकर, माजी नगरसेवक अभय मेळेकर, पं. स. सदस्य अभिजित तेली, नगरसेविका पूजा मयेकर, प्रतिक्षा खडपे, मनीषा मराठे, शुभांगी सोलगावकर, माजी नगराध्यक्षा अपूर्वा मराठे तसेच अनेक शिवप्रेमी नागरिक, शिवसैनिक व महिला वर्ग उपस्थित होता.