Tuesday, Jan 23rd

Headlines:

खरेदीखताची नोंद सातबाराला करण्यासाठी लाच घेताना मंडळ अधिकार्‍याला अटक

E-mail Print PDF
राजापूर (प्रतिनिधी) -  खरेदीखताची नोंद सातबाराला करण्यासाठी १० हजार रूपये लाच स्वीकारताना जैतापूर मंडळ अधिकारी एकनाथ सीताराम बावीसकर व उपळे तलाठी ज्ञानेश्वर रावसाहेब वाडकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या घटनेने राजापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
राजापूर तालुक्यातील गोठीवरे येथे तक्रारदाराने जमीन खरेदी केली असून खरेदीखतही झाले आहे. या खरेदीखताची नोंद सातबाराला होवून त्याप्रमाणे सातबारा मिळावा, यासाठी त्यांनी गोठीवरे गावचे तलाठी यांच्याकडे अर्ज केला होता. त्यानुसार तलाठी यांनी ही नोंद मंजूर करण्यासाठी हे प्रकरण जैतापूर मंडळ अधिकारी एकनाथ बावीसकर यांच्याकडे पाठवल्याचे सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांनी मंडळ अधिकारी बावीसकर यांची भेट घेतली असता त्यांनी खरेदीखताप्रमाणे सातबाराची नोंद मंजूर करण्यासाठी १० हजार रूपयांची मागणी केली. त्यानंतर तडजोड करून ५ हजार रूपये देण्याचे निश्चित झाले.
या प्रकरणी तक्रारदार यांनी रत्नागिरी येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार लाचलुचपत विभागाने मंगळवारी सापळा रचला. मंगळवारी बावीसकर यांनी तक्रारदार यांना लाचेची रक्कम तलाठी ज्ञानेश्वर वाडकर यांच्याकडे देण्यास सांगितली. त्यानुसार दुपारी १२.२५ वाजण्याच्या सुमारास राजापूर प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात तलाठी वाडकर यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱयांनी रंगेहाथ पकडले. त्यानंतर मंडळ अधिकारी बावीसकर यांनाही ताब्यात घेण्यात आले. लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, बी. ए. तळेकर, सहकारी पोलीस हवालदार, कोळेकर, सुपल, ओगले, हरचकर, पोलीस नाईक वीर यांनी ही कारवाई केली. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.