Tuesday, Jan 23rd

Headlines:

खासगी जागांतील बेकायदा बांधकामांन लाखो रुपयांची भरपाई

E-mail Print PDF
देवरुख (प्रतिनिधी) - कशेडी ते हातखंबादरम्यान काही खासगी जागेत जमीनमालकांकडून परवानगी न घेताच बांधकामे उभी करण्यात आली. या बांधकामांचे मोजमाप करून त्यांचे लाखो रुपये अशा बेकायदा बांधकामे करणार्‍यांना देण्यात आल्याच्या अनेक तक्रारी महसूल विभागाकडे करण्यात आल्या आहेत. या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आक्षेप जमीनमालकांचा आहे.
कशेडी ते हातखंबा दरम्यान ज्यांच्या मालमत्तांचे चुकीचे सर्वेक्षण करण्यात आले, त्या जमीनमालकांनी रत्नागिरी जिल्हाधिकार्‍यांकडे दाद मागून फेरसर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे. मात्र यासंदर्भात फार विलंब लागत असल्याने जमीनमालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. काही जमीनमालकांनी केलेल्या फेरसर्वेक्षणाच्या मागणीबाबत निर्णय अजून प्रलंबित असल्याने चौपदरीकरणाचे काम आणखी वर्षभर रखडण्याची भीती व्यक्त होत आहे. याबाबत लवकर निकाल न झाल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय मालकांनी घेतला आहे.
शासकीय जमिनीवर अतिक्रमणे केलेल्या बांधकामांचा मोबदला प्रशासनाने चुकता केला आहे. तसेच बांधकामाचे असेसमेंट नसतानाही संशयितरीत्या लाखो रुपयांचे वाटप करण्यात आल्याने मोबदला वाटपही संशयाच्या फेर्‍यात सापडले आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी संपादित जमिनीचे मोबदला वाटप योग्यरीतीने होत असल्याचा दावा भूसंपादन विभागाने केला असला, तरी प्रत्यक्षात कागदपत्रांची पूर्तता करूनही संगमेश्‍वर तालुक्यातील आरवली ते तळेकांटे दरम्यानच्या अनेकांना त्यांचा मोबदला मिळालेला नाही.