Tuesday, Jan 23rd

Headlines:

भुयार खोदून बँकेचे २७ लॉकर फोडले

E-mail Print PDF
कोपरखैरणे - जुईनगर सेक्टर ११ मधील बँक ऑफ बडोदावर आज दरोडा पडला. बँकेजवळच्या गाळ्यातून भुयार खोदून दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश करून २७ लॉकर फोडले. यामध्ये सोन्याचे दागिने आणि महत्त्वाच्या दस्ताऐवजांची लूट झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
जुईनगर सेक्टर ११ येथील भक्ती टॉवरमध्ये बँक ऑफ बडोदाची शाखा आहे. या बँकेपासून जवळच असलेला एक गाळा शशिकांत कोठावळे यांच्याकडून घेसाराम नावाच्या एका व्यक्तीने भाड्याने घेतला होता. त्यामध्ये त्याने श्री बालाजी नावाने किराणा मालाचे दुकान सुरू केले होते.
दरोडेखोरांनी बँकेच्या कामकाजाची माहिती घेऊन या किराणा मालाच्या दुकानातून दरोडेखोरांनी बँकेपर्यंत ५० फूट भुयार खोदले. त्यानंतर चोरट्यांनी बँकेच्या लॉकररूमपर्यंत पोचत २३७ पैकी २७ लॉकर फोडले. या लॉकरमधून ग्राहकांचे सोन्याचे दागिने, दस्तावेज आणि किमती वस्तू पळवल्या.
बँकेचा सुरक्षारक्षक सकाळी बँकेत आल्यानंतर दरोडा पडल्याचे उघड झाले. यामध्ये नेमका किती ऐवज चोरीला गेला, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
बँकेत दरोडा पडल्याची बातमी वार्‍यासारखी परिसरात पसरली. त्यानंतर ग्राहकांनी बँकेसमोर गर्दी केली. यामुळे बँकेबाहेर काही काळासाठी तणावाचे वातावरण होते. सहायक पोलिस आयुक्त किरण पाटील यांनी सांगितले, की दरोड्याच्या तपासासाठी तातडीने ६ पथके तयार केली आहेत. बँकेतील लॉकर फोडून दरोडेखोरांनी ऐवज लंपास केला असल्याने नेमका मुद्देमाल होता, हे आताच सांगता येणार नाही.