Tuesday, Jan 23rd

Headlines:

डंपरच्या धडकेत तलाठ्याचा मृत्यू

E-mail Print PDF
दोडामार्ग - कुडासे गावचे रहिवासी, माजी सैनिक व मसुरे येथे तलाठी म्हणून कार्यरत असलेले बळीराम अमृत देसाई (४७) यांचा डेगवे येथे डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. सोमवारी सकाळी १०.३० वा.च्या दरम्यान डेगवे माऊली मंदिरनजीक सोसायटीसमोर ही दुर्घटना घडली. कुडासे येथून मसुरे येथे कामावर जात असतानाच हा अपघात घडला. या प्रकरणी डंपर चालक अदप्पा बसप्पा पुजारी (२४, रा. विजापूर) याच्यावर बांदा पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
कुडासे भरपालवाडीतील मूळ रहिवासी असलेले देसाई दोडामार्ग येथील गोवेकर कॉलनीत राहत होते. देसाई हे सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर तलाठी म्हणून शासन सेवेत दाखल झाले होते. २०१० पासून ते तलाठी म्हणून सेवा बजावत होते. सध्या ते मसुरे (ता. मालवण) येथे तलाठी म्हणून कार्यरत होते. शनिवार व रविवार सुट्टी असल्याने ते घरी आले होते. सोमवारी मोटारसायकलने कामावर जात असताना डेगवे येथे त्यांना मोबाईल कॉल आला. दुचाकी रस्त्याच्या बाजूला थांबवून दुचाकीवर बसूनच ते मोबाईलवर बोलत असताना दोडामार्गहून बांद्याच्या दिशेने जाणाऱया डंपरने (जीए  ०५, टी  २४२७) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत देसाई यांच्या डोक्याला व कंबरेच्या खाली जबर मार बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
डेगवे येथील स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत देसाई यांना पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर ग्रामस्थांनी बांदा पोलीस स्थानकात माहिती दिली. अपघातग्रस्त डंपर गोव्यातील असून चालक अदप्पा याला बांदा पोलिसांनी तात्काळ अटक केली. बळीराम देसाई यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व विवाहित मुलगी असा परिवार आहे. कुडासे भरपालवाडी येथील स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात सोमवारी सायंकाळी बळीराम देसाई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.