Tuesday, Jan 23rd

Headlines:

रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहातील हातमाग पुन्हा सुरु होणार

E-mail Print PDF
रत्नागिरी (प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहातील अनेक वर्षे बंद असलेले हातमाग पुन्हा खडाडणार आहे. कारागृहात शिक्षेचे कैदी ठेवणे बंद केल्यामुळे व्यवसायाभिमुख उपक्रम बंद पडले होते. सुनावणी प्रक्रियेतील कैद्यांना काम देता येत नसल्याने व्यवसायाभिमुख उपक्रम राबवणे अशक्य झाले होते. मात्र आता कारागृह प्रशासनाच्या विनंतीवरून पुन्हा शिक्षेचे कैदी रत्नागिरीत दाखल होणार असून हातमाग, शेती व अन्य व्यवसायही सुरू होणार आहेत.
रत्नागिरी कारागृहाला विशेष कारागृह म्हणून संबोधण्यात येते. या विशेष कारागृहात सध्या केवळ शिक्षा सुनावणी प्रक्रियेतीलच कैदी आहेत. १० वर्षांपुर्वी विविध गुन्हयांमध्ये शिक्षा झालेल्या कैद्यांना या ठिकाणी ठेवण्यात येत होते. मात्र त्यानंतर शिक्षेचे कैदी अन्य कारागृहांमध्ये ठेवण्याचा निर्णय झाला. शिक्षेचे कैदी नसल्याने कारागृहाला प्रशासनाला कोणतेही काम व्यवसायिकदृष्टया राबवता येत नव्हाते. बंदिवानांच्या हाताला काम दिले की, त्यांचा कामात वेळ जावून त्यांनाही अर्थाजन होते. श्रमाचे मोल कळते. त्याचबरोबर या वस्तूंच्या विक्रीतून प्रशासनालाही आर्थिक बळ मिळते.
मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी फर्निचर बनविण्यापासून सर्व कामे कैदी करतात. नाशिक कारागृहात तर पैठणी बनवली जाते, तसेच टूथपेस्टही बनवली जाते यातून बंदिवानांना कारागृह प्रशासनाकडून कामाचा मोबदला दिला जातो. याच धर्तीवर रत्नागिरीत १० वर्षांपूर्वी विविध भाजीपाला लागवड मोठया प्रमाणावर केली जायचे. आता काही वर्षे हे सगळे बंद झाले आहे त्यामुळे पुन्हा नव्याने विविध उपक्रम सुरू व्हावे यासाठी जिल्हा कारागृह प्रयत्न करत होते.
याच प्रयत्नांना यश आले आहे. कारागृह प्रशासनाकडे शिक्षेच्या कैद्यांची मागणी करण्यात आली होती त्यानुसार येत्या महिनाभरात २५ कैदी रत्नागिरीत कारागृहात ठाणे, मुंबई येथून दाखल होतील आणि गेले कित्येक वर्षे बंद असलेले हातमाग पुन्हा जोमाने सुरू होणार आहे. त्यामुळे बंदिवानांच्या हाताला कामही मिळणार आहे. कारागृहातील हातमाग बनवलेल्या चादर, सतरंजी यांना यापुर्वी ग्राहकांची पसंती मिळत होती. पुन्हा हे काम सुरू झाल्यास बंदीवानांनाही वेगळी ओळख मिळू शकेल.