Tuesday, Jan 23rd

Headlines:

गडगडी धरणाला गळती; कालव्याच्या भिंतीखालून झिरपतेय पाणी

E-mail Print PDF
देवरुख (प्रतिनिधी) - संगमेश्वर तालुक्यातील वाशी-बोरसुतमधील गडगडी धरणाच्या कलव्यामधून गेले काही दिवस गढूळ पाणी येत असून धरणाखाली गळती लागल्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे धरणाखालील ३० गावे भीतीच्या छायेखाली असून पाटबंधारे विभागाने मात्र ही गळती फार मोठी नसून धरणाला धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे. दुसऱया बाजूला ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी धरण गळतीचा मोठा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करत आहेत. त्यामुळे परिसरातील ३० गावांमध्ये संभ्रमाचे व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गडगडी हे धरण वाशी व बोरसुत या खोऱयात बांधण्यात आले आहे. १९८२ साली या धरणाला अंतिम मंजुरी मिळाली मात्र प्रत्यक्षात १९८७ मध्ये या धरणाचे काम सुरु झाले. २००७ साली एकुण ६० कोटी रुपये खर्च झाले. मात्र त्यानंतर हळूहळू ही रक्कम वाढतच गेली असून आतापर्यंत सुमारे १२० कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अजूनही काही काम अपुर्ण आहे. प्रामुख्याने कालव्याचे काम अपुर्ण असल्याने याचा लाभ शेतकऱयांना घेता येत नाही.
मुख्य धरणाचे काम मात्र पुर्ण असून या धरणात १३.५२६ दलघमी (टीएमसी) एवढया पाणी साठयाची क्षमता आहे. धरणाची भिंत ३३ मीटर उंच असून त्यात दोन वर्षापुर्वी थोडी वाढ करण्यात आली आहे. धरणाचा उजवा कालवा १५ कि.मी. चा तर डावा कालवा ८ कि.मी. चा आहे. मात्र या दोन्ही कालव्याची कामे अपुर्णच आहे. यातून ९१६ हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार होते. मात्र कामच पुर्ण नसल्याने याचा एकही थेंब शेतकऱयापर्यंत पोचलाच नाही.
धरणाचा मुख्य कालवा आहे. तिथून काही दिवसापुर्वी पाणी झिरपत असल्याचे ग्रामस्थांना दिसले. आता या कालव्यातून पाणी सोडण्यात आले असून ते पुर्णपणे गढूळ आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार भिंतीच्या खालून पाणी झिरपत आहे. यावर त्यांनी पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली आहे. पाणी झिरपत असल्याने परिसरातील गावांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. परिसरातील ३० गावांना याचा धोका निर्माण झाला आहे.