Tuesday, Jan 23rd

Headlines:

गणपतीपुळ्याच्या ‘श्रीं’चे आता लाईव्ह दर्शन!

E-mail Print PDF
रत्नागिरी (प्रतिनिधी) - आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सर्वच गोष्टी इंटरनेटशी जोडल्या जात आहेत. अगदी ‘बाप्पा’चे दर्शनही घरबसल्या होऊ लागले आहे. काही देवतांचे दर्शन दूरचित्र वाहिन्यांच्या माध्यमातून तर काहींचे दर्शन लाईव्ह स्ट्रीमींगच्या माध्यमातूनही उपलब्ध आहे. जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळेच्या बाप्पाचे दर्शनही आता घरबसल्या उपलब्ध होणार असून देवस्थान समितीकडून ऍपच्या माध्यमातून लवकरच ही सेवा निशुल्क स्वरूपात उपलब होणार आहे.
गणपतीपुळेच्या देवस्थान समितीकडून विशेष ऍपची निर्मिती करण्यात आली आहे. हे ऍप सध्या गुगल प्ले स्टोअरवर उपलब्धही आहे. मात्र सध्या त्यामध्ये थेट आरती दर्शन उपलब्ध नाही. हे ऍप अपडेट करून त्यामध्ये श्रींच्या दुपारी १२ व सायंकाळी ७ वाजता होणाऱया आरतींचे लाईव्ह स्ट्रीमींग उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यादृष्टीने ऍपमध्ये बदल करणे व त्याच्या चाचण्या घेण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे समजते. या ऍपच्या माध्यमातून रोज दोनदा गणपतीपुळेच्या बाप्पाचे थेट दर्शन घेतानाच दोन्ही आरत्यांचाही थेट लाभ घेता येणार आहे. आरतीमध्ये प्रत्यक्ष नसले तरी ऑनलाईन सहभागी होता येणार आहे. आणि विशेष म्हणजे ही सेवा निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या सुधारित ऍपचा शुभारंभ येत्या काही दिवसातच होणार आहे. याबाबत गणपतीपुळे देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ऍपचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे स्पष्ट केले. तसेच देवस्थानच्या वतीने कोकणची सर्वांगिण ओळख व्हावी यासाठी अन्य एका उपक्रमाचे कामकाजही सुरु असल्याचे व हे दोन्ही उपक्रम लवकरच भक्तांच्या सेवेत रूजू होतील, असे सांगितले.