Tuesday, Jan 23rd

Headlines:

समुद्रातील मुंबईच्या विस्ताराला गती

E-mail Print PDF
मुंबई - ‘मेट्रो-३’ आणि सागरी किनारा मार्ग प्रकल्पात मोठया प्रमाणावर निर्माण होणार्‍या मातीची विल्हेवाट लावण्यासाठी कफ परेडमधील गीतानगर ते एनसीपीए परिसरालगत समुद्रात ३०० एकर जमीन निर्माण करून तेथे ‘ग्रीन पार्क’ उभारण्यात येणार आहे. भराव टाकून निर्माण करण्यात येणार्‍या भूभागासाठी सर्वेक्षण करण्याचे कंत्राट पालिकेने एका संस्थेला दिले आहे. त्याच्या जोडीनेच या प्रकल्पामुळे पर्यावरण आणि भूभागावर होणार्‍या परिणामांचा अभ्यास करण्याची जबाबदारी अनुक्रमे गोव्यातील नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ ओशनोग्राफी (एनआयओ) आणि ‘नीरी’वर सोपविण्यात येणार आहे. मच्छीमार बांधवांचे पुनर्वसन, जेट्टी उभारणे, कांदळवनाचा अभ्यास आदी विविध कामांसाठी सल्लागार नियुक्त करण्याच्या हालचाली पालिकेत सुरू झाल्या आहेत.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ दरम्यान उभारण्यात येणारा ‘मेट्रो-३’ आणि नरिमन पॉइंट ते कांदिवली दरम्यान उभारण्यात येणार्‍या सागरी किनारा मार्ग या दोन्ही प्रकल्पांमध्ये मोठया प्रमाणावर टाकाऊ माती निर्माण होणार आहे. तसेच या प्रकल्पांच्या आड येणार्‍या झाडींचीही कत्तल करावी लागणार आहे. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे संतुलन ढळण्याची शक्यता आहे. प्रकल्पांमध्ये निर्माण होणार्‍या मातीची विल्हेवाट लावणे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी समुद्रात निर्माण होणार्‍या ३०० एकर भूखंडावर ‘ग्रीन पार्क’ उभारण्यात येणार आहे. त्यामुळे सध्याच्या मुंबईच्या ४३७.७१ चौरस कि.मी. क्षेत्रफळात ३०० एकराची भर पडणार आहे.