Tuesday, Jan 23rd

Headlines:

नवी मुंबईत वकिलावर प्राणघातक हल्ला

E-mail Print PDF
नवी मुंबई - जुईनगर येथील वकील अमित कटारनवरे यांच्यावर रविवारी दुपारी ३.१५ च्या सुमारास त्यांच्या कार्यालयातच धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला झाला. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. स्वप्नील सोनावणे हत्या प्रकरणात ते वकील म्हणून काम पाहत होते. या प्रकरणाची सोमवारी ठाणे येथे सुनावणी होणार असताना कटारनवरे यांच्यावर झालेल्या हल्ल्‌यामुळे तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत.  जुईनगर सेक्टर २३ येथे कटारनवरे यांचे कार्यालय आहे. दुपारी तीनच्या सुमारास अमित यांनी कार्यालय उघडून आत प्रवेश करताच चार ते पाच जणांनी त्यांच्यावर धारदार हत्याराने प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. गंभीर जखमी अवस्थेतच अमित यांनी पत्नी ममता यांना फोन करून हल्ला झाल्याचे कळवले. पत्नीने त्यांना डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयात दाखल केले. पोलीस उपायुक्त तुषार दोशी, एसीपी किरण पाटील, नेरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी तात्काळ घटनास्थळी व रुग्णालयात येऊन पाहणी केली.
कटारनवरे यांच्यावर ५ सप्टेंबर रोजी सानपाडा येथे हल्ला झाला होता. त्यावेळी हल्ल्‌यात त्यांच्या गाडीचे नुकसान झाले होते. त्यावेळी हल्लेखोरांनी दलित चळवळीविरोधात व दलित नेत्यांविरोधात भाष्य करतो काय, असे म्हणत हल्ला केल्याचे अमित यांनी पोलीस जबानीत सांगितले होते.