Tuesday, Jan 23rd

Headlines:

सिंधुदुर्गात लेप्टोचे ३३ रुग्ण आढळले

E-mail Print PDF
कणकवली - जिल्ह्यात लेप्टोस्पायरोसीस तापसरीने थैमान घातले आहे. आतापर्यंत २५ गावांत लेप्टो पोचला असून, ३३ रुग्ण लेप्टो पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्याला नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग सक्षमपणे कार्यरत आहे. जिल्ह्यासाठी फिजिशियनचे पथक लवकरच दाखल होणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी आज येथे दिली.
जिल्ह्यात लेप्टोस्पायरोसीससदृश तापसरीचे प्रमाण वाढले आहे. त्यातच कणकवली, सावंतवाडी व कुडाळ येथे लेप्टोचे रुग्ण आढळल्याने भीतीचे सावट निर्माण झाले आहे. आतापर्यंत २५ गावांत लेप्टो पोचला असून, ३३ रुग्ण लेप्टो पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्याला नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा ऍलर्ट झाली आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे यांनी माहिती दिली.
ते म्हणाले, जिल्ह्यात जवळपास २५ गावांत लेप्टोस्पायरोसीससदृश तापसरी सुरू आहे. काही ठिकाणी यात वाढही होत आहे. जे रुग्ण शासकीय रुग्णालयात येत आहेत, त्यांच्यावर स्पॉट टेस्ट केल्या जात आहेत. लेप्टो पॉझिटिव्ह आढळल्यास पेनिसीलीन देत आहोत. जिल्हा रुग्णालयात विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे. या साथीबाबत जनजागृती करून शेतकर्‍यांनी कशा पद्धतीने काळजी घ्यावी, याची माहिती दिली जात आहे. जिल्ह्यातील खासगी दवाखान्यात रुग्ण उपचारासाठी जात आहेत. तेथेही योग्य गाईडलाईनप्रमाणे उपचार व्हावेत म्हणून खासगी डॉक्टरांची कार्यशाळा घेत आहोत. जिल्ह्यासाठी तत्काळ फिजिशियनचे पथक मिळावे, अशी मागणी आहे.’’