Tuesday, Jan 23rd

Headlines:

प्रदुषण करणार्‍या १५ कारखान्यांवर कारवाई

E-mail Print PDF
तळोजा - गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईतील हवेचा दर्जा बिघडविणार्‍या तळोजातील ‘धूर’खान्यांवर  कारवाई करण्यात आली आहे. १५ कारखान्यांच्या प्रतिनिधींवर याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अनेक वेळा ताकीद देऊनही प्रदूषणाची मात्रा कमी होत नसल्याने पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी तळोजा औद्योगिक वसाहतीमधील सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राला (सीईटीपी) गुरुवारी भेट दिली. त्यांनी रात्री उशिरा तळोजा पोलीस ठाण्यात सीईटीपी केंद्रचालक व संचालक मंडळावर पर्यावरणाची हानी केल्याचा ठपका ठेवत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी तळोजा सीईटीपीचालक व कार्यकारिणीचे सदस्य यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. उत्पादन निर्मितीनंतर निघणारे सांडपाणी प्रक्रिया करून थेट नदीत सोडण्याची प्रक्रिया होणे सीईटीपी केंद्रात अपेक्षित आहे. मात्र गुरुवारी सायंकाळी चार वाजता एमपीसीबीच्या अधिकार्‍यांना न कळू देता मंत्री कदम यांनी भेट दिल्यावर दोन प्रकल्पांपैकी १२ एमएलडी क्षमतेचा एक प्रकल्प बंद अवस्थेत दिसला. तसेच सीईटीपी केंद्रातून खाडीपात्रामध्ये पंपाने केंद्रचालक पाणी सोडत असल्यामुळे खाडीपात्र प्रदूषित होत असल्याचे दिसल्यामुळे ही फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. सीईटीपीच्या संचालकांचे स्वत:चे कारखाने आहेत, तर काही सदस्य कारखान्यांचे व्यवस्थापन सांभाळतात.