Tuesday, Jan 23rd

Headlines:

आंबोलीतील दरीत सापडला आणखी एक मृतदेह

E-mail Print PDF
सावंतवाडी - कावळेशेत पॉईंट (गेळे) येथील दरीत सुमारे १२०० फूट खोलवर तरुणाचा मृतदेह शनिवारी सापडून आला. सायंकाळी उशिरा हा मृतदेह बाहेर काढला. त्याचे डोके दगडाने ठेचल्याचे दिसून आले. यावरून त्याचा प्रथम खून करून मृतदेह दरीत फेकल्याचे स्पष्ट झाले. सांगली येथील संशयित आरोपीचा मृतदेह महादेवगडच्या दरीत सापडल्यानंतर पुन्हा चार दिवसांतच हा मृतदेह सापडल्याने आंबोलीत खळबळ उडाली आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले हे गाव आता अशा मृतदेहांसाठी कुप्रसिद्ध होत आहे.  
शुक्रवारी संध्याकाळी कावळेशेत पॉईंटच्या रेलिंग फूटपाथवर रक्ताचे डाग काही पर्यटकांना दिसले. चौकस पर्यटकांनी बारकाईने पाहणी केली असता हे डाग काही अंतरापासून सुरू झालेले आढळले. तसेच दरीच्या दिशेने काही तरी वस्तू ओढत नेल्याच्या खुणा दिसून आल्या. पर्यटकांनी ही माहिती स्थानिकांना दिली. शनिवारी सकाळी एका पर्यटकाच्या एचडी कॅमेर्याने या दरीचे फोटो घेतले असता, दरीत मानवी मृतदेह असल्याचे दिसून आले. स्थानिक पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर पोलिसांनी संध्याकाळी ६ वा. आंबोली पत्कालीन पथक व बाबल अल्मेडा टीमच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. आंबोली आपत्कालीन पथकाचे संतोष पालेकर, राकेश अमृस्कर, शंकर गावडे, अजित नार्वेकर आदी, बाबल अल्मेडा टीम व डीवायएसपी दयानंद गवस, सावंतवाडी पोलिस निरीक्षक सुनील धनावदे, एपीआय अरुण जाधव, आंबोली पोलिस हे. कॉ. विश्‍वास सावंत, कॉ. प्रकाश कदम, कॉ.गजानन देसाई व गेळे पोलीस-पाटील घटनास्थळी उपस्थित होते.
हा मृतदेह पुरुषाचा असून त्याचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे आहे. मृतदेहाचे डोके दगडाने ठेचून चेंदामेंदा करण्यात आला आहे. यामुळे त्याचा चेहराही ओळखू येत नव्हता. रक्त बाहेर पडू नये यासाठी ठेचलेले डोके प्लास्टिक पिशवीत बांधले होते. तर मृतदेहाच्या अंगावर केवळ अंडरवेअर होती. त्याचा मृत्यू ४ ते ५ दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी घटनास्थळीच पंचनामा करून  मृतदेह  विच्छेदनासाठी  आंबोली आरोग्य केंद्रात पाठवून दिला. मृतदेहाची ओळख पटविणारा कोणताही पुरावा सापडला नसल्याचे पोेलिसांनी सांगितले.