Tuesday, Jan 23rd

Headlines:

गोरेगावमध्ये म्हाडा बांधणार ५ हजार घरे

E-mail Print PDF
मुंबई - पुढील वर्षीच्या मे महिन्यात म्हाडातर्फे १ हजार घरांची सोडत काढली जाईल, अशी घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी शुक्रवारी केली. त्याचबरोबर येत्या तीन वर्षात गोरेगावमध्ये पाच हजार घरांची निर्मिती करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.  म्हाडाच्या ८०३ घरांची सोडत शुक्रवारी काढण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
मेमध्ये काढण्यात येणार्‌या सोडतीतील घरांमध्ये  ६० टक्के घरे अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटासाठी असतील. सध्या काढलेल्या सोडतीतील घरे रेडीरेकनरच्या दरापेक्षा २५ टक्के कमी दरातील आहेत असेही वायकर यांनी सांगितले. तर अत्यल्प आणि अल्प गटातील घरांची जास्त मागणी असल्याने आम्ही या गटातील जास्त घरे बांधणार असल्याचे म्हाडाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांनी सांगितले.
५० हजार स्वस्त घरे २०२२ सालापर्यंत प्रत्येकाला घर या संकल्पनेंतर्गत एमएमआरडीए परिसरात ५० हजार स्वस्त घरे उपलब्ध होतील असे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी यावेळी जाहीर केले.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राज्यभरात अडीच लाख घरे बांधण्यास मंजुरी मिळली असून यातील ५० हजार घरे ही मुंबई मेट्रो रिजनमधील असतील. ही घरे सर्वसामान्यांसाठी बांधण्यात येणार असल्याचे विनोद तावडे यांनी यावेळी जाहीर केले. तसेच आठवड्याभरात गोरेगावमधील ५ हजार म्हाडाच्या घरांसाठी निविदा निघणार आहेत. गोरेगाव पश्‍चिम येथील पहाडी नगर येथील १८ एकरचा भूखंड म्हाडाच्या ताब्यात मिळाला आहे.