Tuesday, Jan 23rd

Headlines:

२५ टक्के शाळकरी मुले तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी

E-mail Print PDF
मुंबई - मुंबई शहरातील शाळांमधील दहा ते १९ वयोगटातील प्रत्येक चार मुलांमधील एकजण (२५ टक्के) धूम्रपान तसेच तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी गेला असल्याचे एका सर्व्हेक्षणातून उघड झाले आहे. मणिपाल युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने प्रिन्स अली खान हॉस्पिटल माझगाव यांच्यातर्फे हे सर्व्हेक्षण करण्यात आले.
माझगाव आणि परिसरातील विद्यार्थी संख्या ही आठ ते दहा हजाराच्या घरात असून ३० महापालिका तसेच खासगी शाळांतील एक हजार मुलांमध्ये हे सर्व्हेक्षण करण्यात आले. तंबाखुजन्य पदार्थ व त्याच्या परिणामांसंदर्भात डॉक्टरांनी एक प्रश्‍नावली तयार केली होती. सदर प्रश्‍नावलीचे पाचवी ते नववीमधील विद्यार्थ्यांमध्ये वितरण करण्यात आले. यातील प्रश्‍नांची विद्यार्थ्यांनी जी काही उत्तरे दिली आहेत त्यावरुन सर्व्हेक्षणाचा अहवाल तयार करण्यात आला.  या अहवालानुसार, दहा ते १९ या वयोगटातील प्रत्येक चार मुलांमधील एकजण धुम्रपानाच्या आहारी गेल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती एका वरिष्ठ डॉक्टरांनी दिली.
तोंडाच्या कर्करोगाचे तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन हे मुख्य कारण आहे.  यामध्ये असलेले निकोटीन हे धोकादायक असते याबाबत अनेक विद्यार्थी अनभिज्ञ असल्याचे या सर्व्हेक्षणातून समोर आले आहे. शहरातील विविध कर्करोगाच्या हॉस्पिटलमध्ये तरुण रुग्णांची संख्या का वाढत आहे, यावर या सर्व्हेक्षणामुळे जोरदार प्रकाश पडला आहे.