Sunday, Feb 18th

Headlines:

सिंधुदुर्गात कॉंग्रेसचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रदेश कॉंग्रेसच्या हालचाली

E-mail Print PDF
सावंतवाडी - माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजपात जाणार की नाहीत? जाणार तर कधी हा प्रश्‍न महाराष्ट्रात गेले चार-सहा महिने ‘कट्टाप्पाने बाहुबली को क्यूँ मारा!’ यापेक्षा जास्त चघळला गेला. सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी या विषयात तोंड घातले; मात्र कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मौन सोडले नाही. राणे गेलेच तर सिंधुदुर्गात संघटनेचे अस्तित्व टिकवायचे प्रयत्न प्रदेश कॉंग्रेसने आता सुरू केले आहेत; मात्र हे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याने त्यांची इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती झाली आहे.
कॉंग्रेसनेही शिवसेनेच्याच कार्यपद्धतीचे अनुकरण करत जिल्ह्यातील संघटना राणेंकडे सुपूर्द केली. अर्थात कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसाठी दुसरा पर्यायही नव्हता. कारण राणेंनी कॉंग्रेसमध्ये आल्यानंतर आपल्या आक्रमक शैलीने आपले स्थान निर्माण केले. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षेत्रात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न कुठच्याच कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केला नाही. हळूहळू राणेंनी कॉंग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांनाही आपलेसे केले. ज्यांनी हा बदल स्वीकारला नाही ते राजकीय प्रवाहातून बाहेर फेकले गेले. यामुळे जिल्ह्यात आता अस्तित्वात असलेली कॉंग्रेसची बहुसंख्य संघटना राणेंच्या प्रभावाखालचीच आहे.
या सगळ्या पार्श्‍वभूमीवर राणे कॉंग्रेसमध्ये अस्वस्थ असल्याची चर्चा गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. राणेंनी पक्षाविरोधात उघड बंड पुकारल्याची भूमिकाही अनेकदा घेतली; मात्र कॉंग्रेसने राणेंना वगळून सिंधुदुर्गात कॉंग्रेसचे वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही. यामुळे हळूहळू कॉंग्रेसच्या जुन्या ज्येष्ठ नेत्यांनीही राणेंचे नेतृत्व मान्य केले.
आता राणे भाजपमध्ये जातील अशी चर्चा गेले काही महिने सुरू आहे. शिवसेना, भाजपच्या नेत्यांनी यावर उघड प्रतिक्रियाही दिल्या. राणेंनीही आपण कॉंग्रेस सोडणार नाही अशी ठाम भूमिका कधीच जाहीर केली नाही. असे असूनही कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मौन सोडले नाही. आता मात्र प्रदेश कॉंग्रेस अचानक सक्रीय झाली आहे. चारच दिवसापूर्वी कॉंग्रेसने निष्ठावंतांची बैठक बोलावली होती. यात राणे आणि त्यांच्या समर्थकांना निमंत्रण नव्हते. राणेंनी त्याचवेळी कॉंग्रेसची समांतर बैठक बोलावली. राणेंकडील बैठक हाऊसफुल्ल आणि प्रदेशकडून आलेल्या हुसेन दलवाई, राजन भोसले, विश्‍वनाथ पाटील यांच्या उपस्थितीतील बैठकीला कार्यकर्त्यांचा दुष्काळ असे चित्र होते. प्रदेशकडून आलेल्या या नेत्यांनी राणेंना विश्‍वासात घेतले नसल्याची भूमिका राणेसमर्थकांकडून घेतली. राणेंनीही त्याला पाठींबा दिला.