Sunday, Feb 18th

Headlines:

पूर्णगड येथे बुडालेल्या आणखी दोन मच्छीमारांचे मृतदेहही सापडले

E-mail Print PDF
रत्नागिरी (प्रतिनिधी) - पूर्णगड येथे भरतीच्या लाटेच्या तडाख्यात सापडून उलटलेल्या  बलावातील (नौका) बेपत्ता झालेल्या अन्य दोन मच्छीमारांचे मृतदेह बुधवारी दुपारी दुर्घटना परिसरातच सापडले.  दरम्यान, दुर्घटनेनंतर या आधी मंगळवारी सकाळी दोघांचे मृतदेह सापडले होते.
अब्बास लतिफ पठाण (वय ५२) आणि तवक्कल अब्दुल सत्तार बांगी (३२, दोघेही रा. पूर्णगड) अशी मच्छीमारांची नावे आहेत. सोमवारी दुपारी २ वा. सुमारास जैनुद्दीन पठाण,  हसन पठाण, अब्बास पठाण हे तिघे सख्खे भाऊ आणि तवक्कल बांगी असे चार जण जैनुद्दीन यांची आयशाबी नावाची नौका घेऊन मच्छीमारी करण्यासाठी गेले होते. सोमवारी रात्री मच्छीमारी करून परतताना चॅनलमधून जेटीच्या दिशेने  आत येत असताना मागून आलेल्या अजस्र लाटेच्या तडाख्याने  त्यांची नौका चॅनलमध्येच उलटली. या दुर्घटनेत बलावातील चारही मच्छिमार खाडीत पडले.  
दुर्घटनेनंतर राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेत जैनुद्दीन आणि हसन पठाण या दोघांचे मृतदेह सापडले  होते. मात्र, दोघेजण बेपत्ताच होते. बुधवारी सकाळी  तटरक्षक दल आणि स्थानिक  नौकामाल जयदीप तोडणकर यांच्या नौकेच्या सहाय्याने बेपत्ता  असलेल्या  दोघा मच्छिमारांचा शोध घेण्यात येत होता.
दरम्यान, बुधवारी दुपारी ११.३० वा. सुमारास पूर्णगड खाडीच्या मुखाजवळ जेथे आयशाबी नौका दुर्घटनाग्रस्त झाली होती. त्याच ठिकाणी या शोध पथकाला तवक्कल बांगी आणि अब्बास पठाण यांचे मृतदेह बुधवारी आढळून आले. त्यांचे मृतदेह तातडीने पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. दरम्यान, या दोघांचेही मृतदेह मिळाल्याने मृतांची संख्या आता ४ झाली आहे.