Thursday, Feb 22nd

Headlines:

तब्बल ४६ धरणांमधून पाण्याचा विसर्ग

E-mail Print PDF
रत्नागिरी (प्रतिनिधी) - राज्यातील अन्य विभागांच्या तुलनेत कोकणात ९० टक्के पाऊस झाला असून, या कालवाधीत कोकणातील धरणसाठी ९९ टक्के पाणीसाठा झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात तीन मध्यम आणि ४५ लघू पाटबंधारे प्रकल्प १०० टक्के  भरली असून, यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, पुढील ४८ तासांत रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वार्‍यासह जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनासह पोलिस यंत्रणेला सावधगिरीचा  इशारा देण्यात आला आहे.
यंदा कोकणात मॉन्सूनला गतवर्षाच्या तुलनेत उशिरा सुरुवात झाली तरी सप्टेंबरच्या मध्यावरच  पाऊस रेंगाळला आहे. गतवर्षी याच कालावधीत पावसाने सरासरी कोटा पूर्ण केला होता. कोकणातील पालघर आणि रायगड जिल्ह्यांत पाऊस १०० टक्के झाला आहे, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस ९० टक्के झाला आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात तीन मध्यम आणि ६० लघू पाटबंधारे प्रकल्पांपैकी तीनही मध्यम प्रकल्पांपैकी नातूवाडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. नातूवाडी धरण १०० टक्के भरले असून, उर्वरित दोन धरणांपैकी  गडनदी ७७ टक्के तर अर्जुना प्रकल्पात ९४ टक्के पाणीसाठा आहे. लघुपाटबंधार्‍यांपैकी ४५  धरणे तडुंब भरली आहेत. यामध्ये चिपळूण तालुक्यात ८, गुहागरमध्ये २, संगमेश्‍वर तालुक्यात ६, खेडमध्ये ४, दापोलीत ६, लांजा तालुक्यात ९, राजापूर तालुक्यात ७, मंडणगडमध्ये २, रत्नागिरीत १  अशा  ४५ धरणांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत २८६३ मिमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे.
त्यापैकी चिपळूण तालुक्यात पावसाने चार हजार मिमीचा टप्पा पूर्ण केला आहे तर मंडणगड आणि राजापूर तालुक्यात तीन हजार मिमी पाऊस झाला आहे. अन्य तालुक्यापैकी दापोली, खेड, संगमेश्‍वर आणि लांजा तालुक्यात पावसाने अडीच हजाराचा टप्पा ओलांडला आहे.  गुहागर तालुक्यात २१४७ मिमी आणि रत्नागिरी तालुक्यात २३११ मिमीवर पाऊस रेंगाळला आहे. गतवर्षी याच कालावधीत पावसाने ३४३१ मिमीची सरासरी  गाठली होती.