Thursday, Feb 22nd

Headlines:

शापूरजी पालोनजी कंपनीने अंग काढून घेतल्याने चिपळूण-कर्‍हाड रेल्वेमार्गाचा करार रद्द

E-mail Print PDF
चिपळूण (प्रतिनिधी) - शापूरजी पालोनजी कंपनीने चिपळूण-कर्‍हाड रेल्वे मार्ग उभारणीच्या कामातून अंग काढून घेतले. सरकारने मोठा गाजावाजा करून कंपनीबरोबर केलेला करारही रद्द झाला आहे. मागील दहा वर्षांपासून हा प्रकल्प रेंगाळलेला आहे. प्रभूंच्या कारकिर्दीत त्याला चालना मिळाली; मात्र आता प्रभूंचे खाते बदलल्यामुळे चिपळूण-कर्‍हाड रेल्वे प्रकल्पाच्या भवितव्याबाबतच प्रश्‍न निर्माण झाला आहे.
गेल्या वर्षी १४ ऑगस्टला मुंबई येथे या लोहमार्गाचे काम करणार्‍या शापूरजी पालोनजी कंपनी व कोकण रेल्वे प्रशासनादरम्यान सामंजस्य करार झाला. मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या या कराराचे साक्षीदार सर्वसामान्य नागरिक व्हावेत, यासाठी चिपळूण आणि कराड येथे विशेष सोय केली होती.
हा १०३ किलोमीटरचा लोहमार्ग आहे. या मार्गावर वेहळे, मुंढे, कोयनानगर, पाटण, शेडगेवाडी, खोडशी अशी सहा स्थानके आहेत. या लोहमार्गाचे काम २०२१ ला पूर्णत्वास जाईल, असेही जाहीर केले होते; मात्र प्रत्यक्षात करारानंतर कोणतेही काम सुरू झाले नाही. लोहमार्ग नेमका कसा असेल, तो कोठून जाईल, याबाबत नागरिकांत संभ्रम आहे. करार होऊन वर्ष झाले तरी काम सुरू न झाल्यामुळे कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी रेल्वेचे रत्नागिरी येथील अधिकारी बाळासाहेब निकम यांची भेट घेतली. तेव्हा कोकण रेल्वे आणि शापूरजी पालनजी यांच्यात १५ ऑगस्ट २०१६ ला कर्‍हाड -चिपळूण रेल्वे मार्गाबाबत झालेला करार रद्द झाल्याचे सांगण्यात आले. तांत्रिक कारणामुळे कंपनीने करार रद्द केल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
चिपळूण-कर्‍हाड रेल्वे मार्ग उभारणीबाबत राज्य, केंद्र शासन आणि रेल्वे कंपनी यांच्यात त्रिस्तरीय करार झाला. त्याचे श्रेय घेण्यासाठी रेल्वे मार्ग उभारणीचे काम जास्तीत जास्त वेगाने आणि दर्जेदारपणे मार्गी लावण्यासाठी आम्ही स्वतः लक्ष ठेवणार, असे कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी सांगितले; मात्र कंपनीने काम सोडले व करारही रद्द झाल्याने सारे तोंडघशी पडले.