Thursday, Feb 22nd

Headlines:

परदेशी जाणार्‍या रत्नागिरीकरांमध्ये सातत्याने वाढ

E-mail Print PDF
रत्नागिरी (प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्हयातून परदेशी जाणार्‍यांची संख्या वाढत असून त्यामुळे पासपोर्ट धारकांच्या संख्येतही वाढ होत आहे. रत्नागिरीतील पासपोर्ट विभाग बंद करण्यात आल्याने पासपोर्टसाठी आता मुंबईला धाव घ्यावी लागत असली तरी त्याबाबत इच्छुकांची फारशी तक्रार नाही. गेल्या दिड वर्षात जिल्हयात तब्बल साडेतेरा हजार नागरिकांनी पासपोर्ट काढल्याची माहिती अधिकाऱयांकडून प्राप्त झाली आहे.
पासपोर्ट काढण्यासाठी अर्जदारांना ऑनलाईन नोंदणी अर्ज भरणे अनिवार्य आहे. एक विशिष्ट तारीख मिळाल्यानंतर अर्जदाराची आवश्यक कागदपत्रे तपासण्यासाठी पाचारण केले जाते. ऑनलाईन अर्जाची एक प्रत, फोटो, बायोमेट्रीक पध्दतीने बोटांचे ठसे असे संगणकाद्वारे प्रमाणित केले जातात. त्यांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुंबई पासपोर्ट विभागाकडे आवश्यक कार्यवाहीनंतर सामान्य व तत्काळ अशा दोन प्रकारात पासपोर्ट दिले जातात. चुकीचा पत्ता अर्जदारांने दिल्यास होणार्‍या छानानीवेळी ५ हजाराचा दंडही आकारला जातो.
कधी शिक्षणासाठी तर कधी नोकरीसाठी अनेकांना परदेशात जावे लागत आहे. तसेच कोणाचा मुलगा किंवा मुलगी परदेशात आहे. म्हणून तर पर्यटनाच्या माध्यमातून आज अनेकजण पासपोर्ट काढण्याला महत्व देत आहेत. पासपोर्ट काढण्याची सुविधा यापूर्वी रत्नागिरीतूनही होत होती. त्यामुळे जिल्हयातील नागरिकांना पासपोर्ट काढणे सुलभ व सोयीस्कर ठरत होते. पण येथील पासपोर्ट कार्यालय बंद करुन ते मुंबईला मुख्य कार्यालयाशी जोडण्यात आले आहे. त्यामुळे आता येथील नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी मोठी मुंबई गाठून मोठी कसरत पार पाडावी लागत आहे.
रत्नागिरीतून परदेशात जाणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे येथील पोलीस विभागाकडून सांगण्यात येत आहे. परदेशात जाण्याची संधी कधी चालून येईल हे वाट पाहण्यापेक्षा अनेकजण पासपोर्ट काढण्यास प्राधान्य देत आहेत. गेल्या वर्षभराचा विचार करता रत्नागिरी जिल्हयातील १३ हजार ४५० जणांनी पासपोर्ट काढणाऱयांची संख्या असल्याचे सांगण्यात आले. त्यामध्ये १ जानेवारी २०१६ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत ९ हजार १९ पासपोर्टधारक आहेत. तर १ एप्रिल २०१७ ते ११ सप्टेंबर २०१७ या कालावधीत ४ हजार ४३१ जण पासपोर्टधारक असल्याचे येथील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.