Sunday, Feb 18th

Headlines:

मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनचाही प्रस्ताव

E-mail Print PDF
मुंबई - मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला राज्य सरकारने मान्यता दिली असतानाच आता मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठीही पावले टाकण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता, किती खर्च येईल, आदी बाबी तपासण्याचे काम सुरू असून केंद्र सरकारने त्यात हिस्सा उचलण्यास अनुकूलता दर्शविली असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. दरम्यान, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला शिवसेनेने विरोध केला असून गुजरात निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकरी कर्जमाफीआधी या प्रकल्पाची घाई झाल्याची टीका शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
वांद्रे कुर्ला संकुलात आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र परिसरात किंवा नजीकच्या परिसरात ०.९ हेक्टर अथवा धारावी येथील भूखंडांचे प्रस्ताव देण्यात आले आहेत. भूमिगत स्थानक उभारले जाणार असल्याने त्यासाठी गरज लागेल तितकी जागा उपलब्ध करून दिली जाईल. मुंबई-अहमदाबाद हे सहा तासांत कापले जाणारे अंतर अडीच तासात पार करता येईल.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा अधिक लाभ गुजरातला होणार असल्याने मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प राज्यात करण्यात यावा, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे. राज्य व केंद्र सरकारने प्रत्येकी ५० टक्के वाटा उचलावा, असे प्रयत्न आहेत. केंद्र सरकारने प्रस्तावास अनुकूलता दर्शविली असून आर्थिक व तांत्रिक व्यवहार्यता तपासण्याचे काम सुरू आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या जवळूनच बुलेट ट्रेनचा मार्गही नेल्यास ते सोयीचे होईल, या दृष्टीने चाचपणी सुरू आहे. त्यासाठीही जपानी वित्तीय संस्थेकडून अर्थसाहाय्य घेतले जाणार आहे.