Sunday, Feb 18th

Headlines:

कामळेवीरात कारमधून दोन लाखाची दारू जप्त

E-mail Print PDF
कुडाळ - झारापच्या दिशेने येणार्‍या अल्टो कारला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने थांबविण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने झाराप येथे महामार्गावरून कार कामळेवीर बाजारपेठेच्या दिशेने पळविली. त्या कारचा पथकाने पाठलाग सुरू केल्यावर रेल्वे पुलानजीक आंबा कलमबागेत कार घुसवून तेथेच ती सोडून त्याने पलायन केल्याची घटना मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. गोवा बनावटीच्या दारूचे ५७ खोके कारमध्ये खचाखच भरण्यात आले होते. यात २ लाख १८ हजार ८८० रुपयांची दारू जप्त करण्यात आली.
मिळालेल्या माहितीवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पत्रादेवी-झाराप महामार्गावर कामळेवीर दरम्यान थांबून सापळा रचला होता. पहाटे साडेतीनच्या सुमारास एमएच-०४-डीजे-४२६३ क्रमांकाची अल्टो कार सुसाट वेगाने झारापच्या दिशेने येत होती. पथकातील अधिकाऱयांनी कार थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार न थांबवता चालकाने कार पळवत कामळेवीर बाजारपेठेच्या दिशेने नेली. पथकाने कारचा पाठलाग सुरू केल्यानंतर रेल्वे पुलाच्या बाजूला असलेल्या कच्च्या रस्त्यावरून कार एका बागेत घुसविली. बागेतील लाकडाच्या ओंडक्याला लागून कार अडकली असता, चालकाने कार तेथेच सोडून पलायन केले. त्यानंतर ती कार टोचन लावून कुडाळ येथे आणण्यात आली. हनीबेंल्ड ब्रॅन्डीचे ५७ बॉक्स कारमध्ये सापडले. २ लाख १८ हजार ८८० रुपयांची दारू व दीड लाख रुपयांची कार मिळून ३ लाख ६८ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
विभागीय उपायुक्त संगीता दरेकर व अधीक्षक प्रदीप वळुंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अमित पाडाळकर, दुय्यम निरीक्षक संजय साळवे, सुनील सावंत, जवान हेमंत वस्त, प्रसाद माळी, अवधूत सावंत, प्रशांत परब व विजय राऊळ यांनी या मोहिमेत भाग घेतला.