Sunday, Feb 18th

Headlines:

दोन दिवस धुमाकूळ घालणार्‍या पावसाने जिल्ह्यात साडेनऊ लाखाचे नुकसान

E-mail Print PDF
रत्नागिरी (प्रतिनिधी) - जिल्ह्यात गेले दोन दिवस धुमाकूळ घालणार्‍या परतीच्या पावसाने जिल्ह्यात  साडेनऊ  लाखांचे नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान चिपळूण तालुक्यात झाले असून पावसाने  संगमेश्‍वर आणि लांजा तालुक्यांनाही दणका दिला आहे. अन्य तालुक्यांतही वादळी वार्‍यासह आलेल्या पावसामुळे घरांसही सार्वजनिक मालमत्तेचीही हानी झाली.
गेल्या शनिवारपासून जिल्ह्यात सायंकाळच्या  सत्रात जोरदार वार्‌यासह पाऊस झाला.  रविवारी तसेच सोमवारी जिल्ह्यात वादळी वार्‌यासह आलेल्या पावसामुळे जिल्ह्यात  मोठ्या प्रमाणावर हानी केली. वादळाचा सर्वात जास्त तडाखा चिपळूण तालुक्यात बसला असून वादळाने चिपळूण तालुक्यात ८५ हजार रुपयांची हानी झाली. संगमेश्‍वर तालुक्यातही वादळी वार्‌यासह झालेल्या पावसामुळे दीड लाखांची हानी झाली आहे. लांजा तालुक्यातही पावसामुळे सव्वा लाखांचे नुकसान झाले.  दरम्यान, गेले दोन दिवस झालेल्या पावसामुळे अनेक भागात वीज प्रवाह खंडित झाला होता तर अनेक भागात विद्युत रोहित्रे जळाल्याने महावितरणचेही सुमारे साडेतीन लाखांची हानी झाली.
गेले तीन दिवस विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह सायंकाळच्या सत्रात पाऊस झाला. दुपारी तीन वाजल्यापासून मळभी वातावरणामुळे किनारी भागात आपत्तीजन्य स्थिती निर्माण झाली होती. सोमवारी झालेल्या पावसामुळे  रत्नागिरीनजीकच्या काळबादेवी येथील  किनारी भागात आलेल्या उधाणाने लोकांची त्रेधातिरपीट उडाली.  मंगळवारी मात्र जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलेला होता. ९.६२ मिमीच्या सरासरीने  जिल्ह्यात ८६ मिमी पाऊस झाला. आतापर्यंत जिल्ह्यात  २८४६ मिमी सरासरी पर्जन्यमान नोंदवले गेले आहे.