Thursday, Feb 22nd

Headlines:

वाळूची वाहतूक करणारा ट्रक पुलावरुन कोसळला

E-mail Print PDF
कणकवली - गोव्याहून कोल्हापूरकडे वाळूची वाहतूक करणारा दहाचाकी ट्रक मुंबई-गोवा महामार्गावरील वागदे-टेंबवाडी येथील एका अरुंद पुलावरून सुमारे १५ ते २० फूट अंतरावरील ओहोळात कोसळला. या अपघातात ट्रकचा चकाचूर झाला असून ट्रकची पुढील दोन्ही चाके निखळून पडली; मात्र सुदैवानेच चालक बचावला. हा अपघात रविवारी मध्यरात्री १२ वा.च्या सुमारास घडला. या अपघाताने मुंबई-गोवा महामार्गावरील अरुंद पूलांचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर वागदे-टेंबवाडी येथे ओहोळावर असलेला अरुंद पूल वारंवार अपघातांचे कारण ठरत आहे. मुळात हा पूल अरूंद आहे, शिवाय रेलिंग नाही तसेच याच पूलावर सुरूवातील खड्डे पडले आहेत. त्यातच पुलावरील झाडीमुळे पूलाचा अंदाज वाहन चालकांना येत नाही. असे असतानाही महामार्ग प्राधिकरणने त्याकडे दुर्लक्षच केल्याने अनेक वाहनांना यापूर्वी अपघात झाला आहे. याच अरूंद पूलाचा अंदाज न आल्याने या वाळूवाहू ट्रकला अपघात झाला. त्यात तो २० फूट खाली कोसळला, चाके वर आणि हौदाखाली अशा स्थितीत कोसळला . यात ट्रकची चाकेही निखळून पडली. सुदैवाने ट्रक चालक बचावला. त्याला किरकोळ दुखापत झाली. ट्रक कोल्हापूरचा असून चालक कणकवली नजीक एका गावातील आहे. मात्र, या अपघाताची नोंद सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत कणकवली पोलिस स्थानकात नव्हती.