Thursday, Feb 22nd

Headlines:

ग्रामस्थांच्या उद्रेकानंतर पोलिसांनी जप्त केली गोवा बनावटीची दारु; तिघांना अटक

E-mail Print PDF
सावंतवाडी - गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स गाडीतून उतरविताना पाहिल्यानंतर संतप्त झालेल्या मालपे ग्रामस्थांनी  दारू वाहतूक करणार्‍या कारच्या काचा फोडल्या. ही घटना मालपे- गावठणवाडी येथे सोमवारी सकाळी ६ वा.च्या सुमारास घडली. नागरिकांचा उद्रेक पाहून चालक विलास हुन्नरे यांनी तेथून पळ काढला. मात्र, विजयदुर्ग पोलिसांनी त्याला कणकवली येथून ताब्यात घेतले.  दरम्यान, गोवा दारूचे बॉक्स घेणार्‍या शंकर समजीसकर या दाम्पत्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर मारुती ओम्नी व सुमारे ४० हजार रुपयेकिमतीची गोवा  दारू जप्त केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कणकवली येथील विलास रामचंद्र हुन्नरे (वय ६४) हा त्याचा मालकीच्या गाडीने सोमवारी सकाळी गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स घेऊन मालपे येथे गेला होता. सकाळी ६ वा. च्या सुमारास मालपे - गावठणवाडी येथे तेथीलच शंकर लक्ष्मण समजीसकर (५०) व त्यांची पत्नी स्वाती शंकर समजीसकर (४५) हे दोघे जण त्याचा गाडीतील दारूचे बॉक्स उतरवून घेत असताना लोकांनी पाहिले. हा प्रकार पाहून संतप्त झालेल्या लोकांनी तेथे जात कारच्या काचा फोडल्या. यावेळी ओम्नीचालक विलास हुन्नरे हा लोकांच्या उद्रेकाने घाबरून तेथून पळाला.
त्यानंतर लोकांनी मालपे पोलिस पाटील विलास गोपाळ सुतार यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलिस पाटील यांनी विजयदुर्ग पोलिस स्टेशनला कळविल्यानंतर पोलिस नाईक आगा, गुणिजन, महिला कॉं. मिठबांवकर, चालक कदम यांनी घटनास्थळी जावून मारूती ओमनी ताब्यात घेतली.
गाडीमध्ये गोवा बनावटीच्या हनी गाईड ब्रँडीचे १३ बॉक्स व १९३ बॉटल अशी ४० हजार रुपये किंमतीची दारू ताब्यात घेतली. विजयदुर्ग पोलिसांनी ओमनी गाडी व दारूसहीत सुमारे १ लाख ९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
या प्रकरणातील पळून गेलेला संशयित विलास हुन्नरे याला विजयदुर्ग पोलिसांनी कणकवली येथून तर शंकर समजीसकर व त्यांच्या पत्नीला मालपे तिठा येथून ताब्यात घेतले आहे.
बेकायदेशीररित्या गोवा बनावटीची दारूची वाहतूक करणे, दारू ताब्यात बाळगणे व विक्री करणे याप्रकरणी विलास हुन्नरे, शंकर समजीसकर, स्वाती समजीस्कर या तिघांविरूध्द गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तपास स.पो. निरिक्षक अमोल चव्हाण करीत आहेत.