Thursday, Feb 22nd

Headlines:

मेट्रो कामाला ध्वनिप्रदूषणाचे नियम लावणे चुकीचे असल्याचा दावा

E-mail Print PDF
मुंबई - ‘कुलाबा-सीप्झ मेट्रो ३’ प्रकल्पाला ध्वनिप्रदूषणाशी संबंधित नियम लागू होऊ शकत नाहीत, असा दावा मुंबई मेट्रो रेल्वे प्राधिकरणाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे करण्यात आला आहे. मेट्रोच्या कामाला रात्री न्यायालयाने मनाई केल्याच्या पार्श्‍वभूमीवर संबंधित दावा करण्यात आला आहे.
दक्षिण मुंबईत सध्या मेट्रो-३ चे भुयारी मार्गाचे काम जोरात सुरू आहे; मात्र कामामुळे निर्माण होणार्‍या आवाजामुळे जवळच्या रहिवाशांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने मेट्रोचे काम रात्री १० ते सकाळी ६ दरम्यान करण्यास मनाई केली आहे; मात्र मेट्रो-३च्या प्रकल्पाबाबत ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची अंमलबजावणी होऊ शकत नाही, त्यामुळे आवाजावर मर्यादा घालण्याची मागणी अयोग्य आहे, असा बचाव प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आला आहे. लवकरच या याचिकेवर मुख्य न्यायमूर्तींच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे. व्यक्तिगत कारणावरून याचिका दाखल करण्यात आली आहे, त्यामुळे ती जनहित याचिका होऊ शकत नाही, असेही प्राधिकरणाचे म्हणणे आहे.