Thursday, Feb 22nd

Headlines:

सेना नेत्यांमध्ये धुसफूस, मंत्र्यांविरोधात नाराजी

E-mail Print PDF
मुंबई -  शिवसेनेत खासदार, आमदार व नेत्यांमध्ये भांडणे वाढली असून मंत्री, सचिव आदींविरोधात नाराजी आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हस्तक्षेप करावा लागत असून त्यांचे खासगी सचिव मिलींद नार्वेकर यांच्याविषयीही ठाकरे यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. संघटनेतील पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्‌यांवरुनही नाराजी आहे.
शिवसेनेचे मंत्री आमदार व पदाधिकार्‍यांची जनतेची कामेही करीत नाहीत, या तक्रारींचा पाढा ठाकरे यांच्यापुढे अनेकदा वाचण्यात आला आहे. त्यांनी मंत्र्यांना सूचना देऊनही त्यात फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे आमदार तुकाराम काते यांनी तीव्र संताप व्यक्त केला. देवनार येथील महापालिका  वसाहतीतील कर्मचार्‍यांना घराबाहेर काढले जात आहे, तर मुक्त मार्गासाठी पुनर्वसन केलेल्यांना मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडून घुसखोर ठरविण्यात येत आहे. हे दोन्ही प्रश्न ते अनेक महिने मांडत असून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना सांगूनही त्यांनी काहीच न केल्याने काते नाराज आहेत. ठाकरे यांनी त्यांच्याप्रकरणात तातडीने लक्ष घालून त्यांना व संबंधितांना ‘मातोश्री’ निवासस्थानी बोलावून घेऊन सूचना दिल्या आणि रविवारी बैठकही घेणार आहेत.
ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी संघटनेच्या पदाधिकार्‍यांच्या घेतलेल्या बैठकीतही तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. सचिव खासदार अनिल देसाई, विनायक राऊत व नार्वेकर यांच्याकडून पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्‌या करताना संपर्क प्रमुखांना काहीच कळविले जात नाही किंवा विचारण्यात येत नाही. मात्र निवडणुकीतील विजयाची जबाबदारी मात्र त्यांच्यावर टाकून अपयशाबाबत जाब विचारला जातो. चुकीच्या नेत्यांकडे पदे देण्यात आली, तर त्यांच्याकडून कामगिरी न झाल्यास नियुक्त्‌या करणार्‍या नेत्यांवरच निवडणुकीच्या यशापयशाची जबाबदारी टाकायला हवी, असे मत संपर्क प्रमुखांनी ठाकरे यांच्यापुढे व्यक्त केले होते. त्यामुळे आता विभागप्रमुख, तालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुख यांच्या नियुक्त्‌या करताना संपर्कप्रमुखांशी चर्चा करुन निर्णय घेण्याची पध्दत अवलंबिण्याच्या सूचना ठाकरे यांनी दिल्या आहेत.