Thursday, Feb 22nd

Headlines:

राज्यात अपुर्‍या पावसामुळे २० टक्के क्षेत्रातील सोयाबीनचे मोठे नुकसान

मुंबई - यंदा खरीप हंगामात राज्यात झालेल्या अनियमित पावसाचा सोयाबीनला मोठा फटका बसला असून महाराष्ट्रात सोयाबीनच्या २० टक्के क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (सोपा) वर्तवला आहे.
यंदा राज्यात अनेक भागात अपुर्‍या पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादकतेवर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. राज्यात अमरावती आणि लातूर विभागात सर्वाधिक क्षेत्र सोयाबीन लागवडीखाली आहे. सोयाबीन लागवडीखालील क्षेत्राच्या सुमारे ८० टक्के भागात सोयाबीनच्या जेएस ३३५ या वाणाची लागवड करण्यात आली आहे. सध्या पीकस्थिती समाधानकारक असली, तरी पावसाने मध्यंतरीच्या काळात मोठा खंड दिल्याने उत्पादकता घटणार असल्याचे ‘सोपा’च्या सर्वेक्षणातून सांगण्यात आले आहे.
राज्यात यंदा ३७.९४ लाख हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी सर्वाधिक १४.०४ लाख हेक्टर क्षेत्र अमरावती विभागात तर १३.९१ लाख हेक्टर क्षेत्र लातूर विभागात आहे. राज्यात सुमारे ६.७ लाख हेक्टर क्षेत्रातील पिकाचे पावसाच्या अनियमिततेमुळे मोठे नुकसान झाले असून केवळ ४.७२ लाख हेक्टर क्षेत्रात चांगले पीक दिसून आले आहे. १९.७४ लाख हेक्टर क्षेत्रात पीक किमान समाधानकारक आहे. अमरावती विभागात २.४३ लाख हेक्टर तर लातून विभागातील २.७२ लाख हेक्टर क्षेत्रातील पीक खराब स्थितीत असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. ‘सोपा’ने महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील सोयाबीनच्या परिस्थितीविषयी माहिती संकलित केली आहे. मध्यप्रदेशातही अपुर्‍या पावसाचा सोयाबीनला फटका बसला आहे. मात्र, महाराष्ट्रातील नुकसान लक्षणीय आहे. गेल्या खरीप हंगामात राज्यात सोयाबीनची उत्पादकता ११०२ किलोग्रॅम प्रतिहेक्टर असल्याचे ‘सोपा’च्या अहवालात म्हटले आहे.