Sunday, Feb 18th

Headlines:

पाच लाखाची लाच घेतांना मुख्याध्यापकासह दोघे जाळयात

E-mail Print PDF
देवगड - शिक्षकाला नोकरीमध्ये कायमस्वरुपी करण्याचा प्रस्ताव शिक्षणाधिकाऱयांकडे पाठविण्यासाठी तब्बल पाच लाख रुपयांची लाच घेणार्‍या तळेबाजार येथील महात्मा गांधी विद्यामंदिरचे मुख्याध्यापक सदाशिव संतराम पाटील (५७, तळेबाजार साईनगर) व त्याचा साथीदार संतोष बापू वरेरकर (५०, वरेरी- बौद्धवाडी) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास मुख्याध्यापक पाटील याच्याच निवासस्थानी करण्यात आली. संशयित वरेरकर हा प्रशालेचा खजिनदारही आहे. आरोंदा येथील तलाठ्याला लाचप्रकरणी पकडण्यात आल्याची घटना ताजी असतानाच सलग दुसर्‍या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तळेबाजारमध्ये केलेल्या कारवाईमुळे जिल्हयात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेबाजार येथील महात्मा गांधी विद्यामंदिर ही सरकारी अनुदानित शाळा आहे. या विद्यामंदिरमध्ये सुरुवातीला हंगामी शिक्षक म्हणून रुजू झालेले शिक्षक एम. आर. चव्हाण हे सन २०१२ पासून सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत होते. चव्हाण यांनी आपल्याला सेवेत कायमस्वरुपी करण्याबाबत उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. या दाव्याचा निकाल चव्हाण यांच्या बाजूने लागला. या निकालाच्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करून तो शिक्षणाधिकारी यांच्याकडे मान्यतेला पाठविण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक पाटील याने चव्हाण यांच्याकडे तब्बल दहा लाख रुपयांची मागणी केली. यातील पाच लाख रुपयांचा पहिला हप्ता देण्यास मुख्याध्यापक पाटील याने चव्हाण यांना सांगितले. त्यानंतर शिक्षक चव्हाण यांनी मुख्याध्यापक पाटील याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ३ सप्टेंबर रोजी तक्रार दाखल केली.
चव्हाण यांच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४ व ८ सप्टेंबर रोजी मुख्याध्यापक पाटील व चव्हाण यांच्यातील संभाषणाची पडताळणी केली. या संभाषणात मुख्याध्यापक पाटील याने पाच लाखाचा पहिला हप्ता मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संग्रामसिंह निशानदार यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग पोलीस उपअधीक्षक शंकर चिंदरकर, पोलीस निरीक्षक एम. एम. केणी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक फाले, पोलीस नाईक परब, पोलीस शिपाई दळवी, जामदार, पोतनीस, पालकर, महिला पोलीस नाईक प्रभू, चालक पोलीस नाईक पेडणेकर यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी ७.३० वा. च्या सुमारास तळेबाजार साईनगर येथे मुख्याध्यापकाच्या निवासस्थानी सापळा रचला.
शिक्षक चव्हाण यांनी मुख्याध्यापक पाटील याच्या निवासस्थानी जात पाच लाखाची रक्कम देऊ केली. ही रक्कम वरेरकर याने स्वीकारली. या संपूर्ण रकमेमध्ये दोन हजाराच्या चार भारतीय चलनी नोटा व इतर डमी नोटा ठेवण्यात आल्या होत्या. ही लाच स्वीकारतांनाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुख्याध्यापक पाटील व वरेरकर यांना रंगेहाथ पकडले.
मुख्याध्यापक पाटील व वररेकर या दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायदा सन १९८८ चे कलम ७, १२, १३ (१) (ड) सह १३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पाटील याची प्रकृती बिघडल्याने त्याला सोमवारी अटक करण्यात येणार आहे. तर संशयित वरेरकर याला ओरोस जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, सरकारी कामासाठी लाच देणे व देणे हा गुन्हा आहे. जनतेने जागरुक राहावे. लाच देणारा किंवा घेणारा याबाबत माहिती मिळाल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.