Thursday, Feb 22nd

Headlines:

सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेसमध्ये अंतर्गत संघर्षाला सुरुवात

E-mail Print PDF
कणकवली - कॉंग्रेस नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसने याची गंभीर दखल घेत सिंधुदुर्गात कॉंग्रेस संघटना वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हा प्रयत्न सुरू झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेस अंतर्गत संघर्ष सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. नारायण राणे यांना डावलून महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष खा. हुसेन दलवाई यांनी सावंतवाडीत येवून बैठक घेतली. राणे यांनी या संदर्भात हुसेन दलवाई यांच्या भूमिकेवर टीका करत सिंधुदुर्ग कॉंग्रेस आणि हुसेन दलवाई यांचा काही संबंध आहे का? असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. दरम्यान, आ.नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांसह सावंतवाडीत दलवाई यांनी बोलविलेल्या बैठकीत जावून त्यांना धारेवर धरले.
गेले पंधरा-वीस दिवस राणे यांचा भाजप प्रवेश निश्‍चित झाल्याच्या बातम्या बाहेर पडत होत्या. परंतु प्रवेशाचा मुहूर्त अद्याप ठरलेला नाही. तोवर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसने राणे भाजपमध्ये प्रवेशले तर कॉंग्रेस संघटना वाचविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांना संपर्क साधण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून खा.दलवाई आणि  कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, आ. विश्‍वनाथ पाटील यांनी सावंतवाडीत शुक्रवारी बैठक घेतली. जिल्हा पातळीवर कॉंग्रेसचे प्रांतिक सदस्य आणि जिल्हा बँकेचे संचालक विकास सावंत यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आणि या बैठकीला कॉंग्रेसचे काही कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र या बैठकीत कॉंग्रेस नेते  नारायण राणे यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते.