Sunday, Feb 18th

Headlines:

चौके येथे चिरे वाहतूक करणारा डंपर उलटला

E-mail Print PDF
मालवण - चिर्‍यांची वाहतूक करणार्‍या डंपरवरील चालकाचा ताबा सुटून डंपर रस्त्याच्या बाजूला पलटी होऊन अपघात झाला. यात चालकासह पाच जण जखमी झाले. यातील दोघांना गंभीर दुखापत झाली. त्यांना मालवण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हा अपघात  शुक्रवारी सकाळी ११ वा. च्या दरम्यान  चौके येथे सागर दर्शन पॉंईटच्या तीव्र उतार व वळणावर झाला.
मालवण येथील राजन वरवडेकर यांच्या मालकीचा डंपर (एम. एच. ०७. सी. ६३८६) चौके येथून चिरे भरून डंपर चालक अमोल बाळकृष्ण कोकरे हा मालवण येथे येत होता. चौके सागरदर्शन येथे तीव्र उतार व वळण असलेल्या रस्त्यावर त्याचा डंपरवरील ताबा सुटला आणि डंपर रस्त्याच्या बाजूला जात पलटी झाला. या अपघातात डंपरच्या हौद्यामध्ये बसलेले कामगार आशिष सुरेश करंजेकर व बाबूराव लक्ष्मण झोरे या दोघांच्या अंगावर चिरे पडल्याने  ते गंभीर जखमी झाले. तर डंपरचालक अमोल बाळकृष्ण कोकरे सह बाबूराव धुळाजी बुटे, जानू विठ्ठल खरवते हे किरकोळ जखमी झाले. या अपघातात डंपरच्या दर्शनी भागाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.जेसीबीच्या मदतीने डंपर मधील चिरे बाजूला करण्यात आले.त्यानंतर जेसीबीच्या सहायाने पलटी झालेला डंपर सरळ करण्यात आला.डंपर पलटी झालेला समजताच घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
या अपघाताची माहिती मिळताच आंबेरीचे  सरपंच उदय केळुसकर, नितीन गावडे, विजय गावडे, प्रभाकर गावडे, बाळा दळवी, बबन झोरे, विनोद दळवी, संतोष गावडे यांनी घटनास्थळी धाव घेत चिर्‌याखाली सापडलेल्या दोन्ही कामगारांना बाहेर काढले. त्यानंतर जखमींना रुग्णवाहिकेतून येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.  चौके सरपंच राजा गावडे, बिजेंद्र गावडे, पापा मालंडकर, सचिन आंबेरकर, पपु वराडकर, सागर गोवेकर तसेच अन्य लोकांनी सहकार्य केले.
अपघातात जखमी आशिष सुरेश करंजेकर (रा.कुंभारमाठ), बाबूराव लक्ष्मण झोरे (रा. कुंभारमाठ), बाबूराव धुळाजी बुटे (रा.आनंदव्हाळ), जानू विठ्ठल खरवते (रा.कातवड) या जखमींना उपचारासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या जखमींंवर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील,डॉ.अजित लिमये, डॉ. सुरेश पांचाळ, डॉ. अनिरुद्ध मेहेंदळे यांनी उपचार केले. गंभीर जखमी झालेल्या आशिष करंजेकर यांच्या डोक्यास मार बसल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे डॉ.पाटील यांनी सांगितले. जखमींची गणेश कुडाळकर, नगरसेवक गणेश कुशे यांनी ग्रामीण रुग्णालयात जात विचारपूस केली.