Monday, Jan 22nd

Headlines:

सक्षमीकरणाच्या दिशेने आत्मसन्मानाची पाऊलवाट! ‘अप’वर मागवा ‘राजवाडी’ भाजी; महिलांचा वाढता प्रतिसाद

E-mail Print PDF
00_rb2
00_rb1
पाण्याविना करपणारी शेती, शेतमालाला भाव नाही, निकृष्ट बियाणं, खतांची दरवाढ आणि निसर्गाची अवकृपा अशी निराशाजनक पार्श्‍वभूमी एकीकडे दिसत असताना संगमेश्‍वर तालुक्यातील राजवाडी भागातील महिला-पुरूष बचतगटांनी सामूहिकरित्या सेंद्रीय पद्धतीने शेती फुलवली आहे. हा उत्पादीत माल गेले तीन महिने ‘व्हॉटस्‌ऍप’च्या माध्यमातून थेट ग्राहकांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध करून दिला. आता ‘ऍप’च्या माध्यमातून ‘राजवाडी’ भाजीची विक्री सुरू होत आहे. मेहनत करा आणि उत्पन्न मिळवा या सूत्रानुसार राजवाडीच्या शेतकर्‍यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी ‘सामूहिक सेंद्रीय शेती’चा मार्ग अनुसरला आणि आत्मसन्मान जपत खेड्याकडे चला हा संदेश पोहचवण्यासाठी हातभारच लावला आहे. खेडी स्वयंपूर्ण होण्यासाठी उचललेलं एक क्रांतिकारी पाऊलच म्हणता येईल.
शेतीसाठी जमीन आणि पाणी आवश्यक. त्याची उपलब्धता होती पण पावसाळी भातशेतीपलिकडे विचार आणि कृती होत नव्हती. उन्हाळ्यातही हिरवीगार शेती फुलवू शकतो हा विचार पुढे आला. त्याला पत्रकार सतिश कामत यांनी सामूहिकत्वाची जोड दिली. यासाठी ‘पेम’ अर्थात पीपल्स एम्पॉवरिंग मूव्हमेंट या संस्थेची साथ मिळाली. याशिवाय पुण्याच्या बासुरी फाऊंडेशननेही आर्थिक मदतीचा हात दिला. या उपक्रमात सहभागी सदस्यांनीही आर्थिक योगदान दिले. या सर्वांच्या प्रयत्नातून राजवाडी गावातून वाहणार्‍या नदीवर बंधारा घालून पाणी शेतीपर्यंत पोहचविण्यासाठीचा मार्ग सुकर झाला. यामुळे १५ एकर शेतजमिनीत पाणी खेळू लागल्यावर शेत सोन्यावाणी पिकायला फार वाट पहावी लागली नाही. २०१४ मध्ये कडधान्ये आणि भाजीपाला पिकवला गेला.
हा उपक्रम अधिक जोमाने करता यावा यासाठी दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पराग हळदणकर यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन सुरू केले. ज्यांच्याकडे जमीन आणि पाणी दोन्हीही नाही अशा शेतकर्‍यांनाही या उपक्रमात सामावून घेतले. ‘मेहनत करा, उत्पन्न मिळवा’ या सूत्रानुसार प्रथम पालेभाजी पिकवायला सुरूवात झाली. मुळा, माठ, पालक या तीन पालेभाज्यांनी सुरूवात झाल्यानंतर दुधीभोपळा, भेंडी, वांगी, वाली, मिरची, कोथिंबीर याचबरोबर सुरण, घेरकंद या कंदभाज्या घ्यायला सुरूवात केली. सेंद्रीय पद्धतीने पिकवलेल्या या भाज्या प्रथम जवळच्या कडवई बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या. पण रत्नागिरीची बाजारपेठ मिळावी यासाठी पत्रकार सतिश कामत यांनी ‘व्हॉटस्‌ऍप’ या माध्यमाचा आधार घेतला. ८ जानेवारीपासून हा उपक्रम सुरू झाला. व्हॉटस्‌ऍपवर ग्रुप तयार करून त्यावर उपलब्ध भाजीची माहिती देणे आणि ग्राहकांनी मागणी नोंदवणे असं स्वरूप होतं. याला रत्नागिरीतील महिलावर्गाने उत्तम प्रतिसाद देत अवघ्या काही दिवसात एका ग्रुपची मर्यादा संपल्याने दुसरा ग्रुप करणं भाग पडलं. ३५० च्यावर आज या ग्रुपचे सदस्य आहेत. याची लोकप्रियता वाढत असल्याने आता गद्रे इन्फोटेकच्या पुढाकाराने राजवाडी भाजी असे ऍप तयार करण्यात आलं आहे. इथून पुढे भाजीची मागणी या ऍपच्या माध्यमातून नोंदवली जाणार आहे. प्रत्येक सदस्याला यासाठी पासवर्ड दिला जाणार आहे. यामुळे अन्य कोणी त्याच्या नावावर मागणी नोंदवू शकणार नाही. ऍन्ड्रॉईड मोबाईल हॅण्डसेट असलेल्या कोणालाही ऍप सहज डाऊनलोड करता येऊ शकेल. अन्य ग्राहकांसाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे.
८ जानेवारीपासून सुरू झालेला हा उपक्रम आठवड्यातील सोमवार, बुधवार, शुक्रवार हे तीन दिवस पालेभाज्या धुऊन, चिरून तर फळभाज्या धुवून साफ करून प्लास्टीक पिशवीमध्ये पॅक करून ग्राहकांपर्यंत पोहचू लागला. शेतकर्‍यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी जयस्तंभ येथील शेट्ये पेपरस्टॉलचे मालक अभिजित शेट्ये यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांना गोखले नाका येथील निर्लेप ऑनलाईन, सावरकर नाट्यगृहाजवळील व्ही. जी. फ्रोझन फूडस्, साळवी स्टॉपचे आगाशेंचे अनंत वस्तू भांडार यांनीही वितरणासाठी सहकार्याचा हात दिला.
ग्राहकांची मागणी लक्षात घेवून फणसाची कुयरी चिरून शिजवून देण्यात येत आहे. याशिवाय कणीस, ढोबळी मिरची, काटेरी वांगी, गवार या भाज्याही उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. यापुढे जाऊन दोडकी, पडवळ, तोंडल अशा वेलवर्गीय भाज्याही उपलब्ध होणार आहेत. राजवाडीच्या या गटात धामणी, नायशी येथील शेतकरी बचतगटांनीही सहभाग नोंदवत त्यांच्या भाज्याही विक्रीसाठी येत आहेत. गटांची संख्या वाढवत नेताना मागणीनुसार पुरवठा करता येऊ शकेल अशी समर्थता वाढवण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. येत्या उन्हाळ्यात अन् पावसाळी भाज्यांची आवक वाढेपर्यंत यावर्षी या हिरव्यागार सेंद्रीय भाज्यांची मेजवानी समस्त रत्नागिरीकर महिलांना मिळत राहणार आहे. पावसाळ्यातही खास पावसाळी पालेभाज्याही देण्याचा मानस आहे.
या उपक्रमात राजवाडीतील महिला बचत गटांबरोबरच पुरूष बचतगटही सहभागी आहेत हे लक्षात घ्यायला हवे.  नागराज महिला बचत गट, गणपती महिला बचत गट, कृषीरत्न बचत गट, कृषीउन्नती बचत गट, याशिवाय धामणी, नायशी येथील बचतगटही सहभागी झाले आहेत. या बचतगटातील मनोहर सुर्वे, सुरेश भडवलकर, संतोष भडवलकर, जयराम भडवलकर, सुहास लिंगायत, विलास राऊत, प्रकाश खांबे, तुकाराम भडवलकर, विजय भडवलकर, बापू भडवलकर यांच्यासह सरपंच नंदू मांजरेकर, शेंबवणे गटातील प्रिया म्हादे, मानसी म्हादे, ऋतुजा गावडे, धाम आणि सदस्य, धामणीचे प्रकाश रांजणे, अमोल लोध, नायशीचे सरपंच किशोर घाग आण अन्य सदस्य शेतकरी या सर्वांचे प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत. यामध्ये प्रत्येकाचं आर्थिक योगदान असल्याने आपलं समजून करण्याची वृत्ती आणि काही समस्या उद्भवली तरी समुहाने सोडवण्यासाठी पुढाकार ही बाजू यशाचं मोजमाप करताना लक्षात घ्यावी लागते. भाजीच्या रोपांची लागवड करताना मेहनत घेतली की दररोज पाणी वगैरे व्यवस्थित मिळतं ना असं २/३ तासाचं काम राहतं. मागणी नोंदवण्याच्या दिवशी मागणीप्रमाणे भाज्यांची पाकिटं तयार करणं असे कामाचं स्वरूप राहतं. दिवसभर आपला संसार आणि इतर कामकाज सांभाळून हा व्यवसाय पुढे जात आहे. मेहनत करणार्‍याला महिना ३/४ हजार जे मिळतात ते त्यांचा आत्मसन्मान वाढवण्यास मदतगार ठरतात. यातूनच याचं आर्थिक सक्षमीकरण होत आहे. सामूहिक सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेलं हे पाऊल स्वतःबरोबर कुटुंब आणि पर्यायाने गावाचा, समाजाचा विकास करण्यास हातभार लावत आहे. प्रगतीचा हा रथ पुढे जातच राहणार आहे. तीन महिन्यात ७५ हजार रु. भाजी विक्रीचा टप्पा पार केला असला तरी भविष्यात हा आकडा ६ च्या घरात जाईल हे नक्कीच.

आर्थिकदृष्ट्या परवडत नाही म्हणून अगर मेहनत घेण्यास मनुष्यबळ नाही म्हणून दुग्धव्यवसायाकडे पाठ फिरवली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर राजवाडी भाजी गटातील काही महिला सदस्यांनी ६ गाई खरेदी केल्या. गटाच्या मालकीच्या या गाई आज ३०/४० लीटर दूध देतात. जवळच्याच भागात दूधाची विक्री केली जाते. सध्या याला ३०/- रु. लि. दर मिळत आहे. पण याच दुधाचं दही रत्नागिरीत विक्रीसाठी उपलब्ध झालं आहे. जयस्तंभ येथील शेट्ये न्यूजपेपर स्टॉलवरच सध्या हे उपलब्ध आहे. याचीही आगाऊ मागणी नोंदवून घेतली जाते. मागणीनुसार दही देण्यात येते. भविष्यात १०० लि. च्या पुढे दूधाची अपलब्धता झाली की रत्नागिरीतही हे दूध मिळू शकणार आहे. तूर्तास दहीच मिळणार आहे. या उपक्रमालाही प्रतिसाद चांगला मिळत आहे.

-संगीता करंबेळकर