Saturday, Jan 20th

Headlines:

‘अन्नपूर्णे’चा साक्षात्कार ः केळकर उपाहारगृह!

E-mail Print PDF
00_ku
आहारशास्त्रात सात्विक आहार सर्वश्रेष्ठ मानला जातो. अन्नातून सर्व रसाचं सेवन व्हावं जेणेकरून निरोगी, सुदृढ शरीर कमावता येईल असं आपलं आहारशास्त्र सांगतं. अन्नदेवता म्हणून ‘अन्नपूर्णा देवी’ची घरोघरी पूजा होते. ज्या घरात कोणीही विन्मुख परत जात नाही त्या ठिकाणी ‘अन्नपूर्णा’ प्रसन्न आहे असंही म्हणतात. याच अन्नपूर्णेचा साक्षात्कार येथील ‘राजा केळकर उपाहारगृहात’ अनुभवायला मिळतो.
‘खाण्यासाठी जन्म आपुला’ असला तरी चविष्ट अन् रूचकर भोजनाची प्रत्येकाला आवड असते. पण हे अन्न बनवताना गृहिणींचा जो मूड असेल तसा अन्नाला स्वाद येतो असं आपले पूर्वज सांगतात. म्हणजेच प्रेमाने, आपुलकीने, आनंदाने अन्न शिजवलं तर तेच अन्न अधिक चवदार लागते. पण काही कारणाने राग, संताप, तिरस्कार या भावना अन्न शिजवताना असतील तर ते अन्नही बेचव लागतं. जे घरात तेच उपाहारगृहात. हा स्वभावधर्म लक्षात घेऊन केळकर उपाहारगृहात मिळणारे पदार्थ नेहमीच ‘अन्नपूर्णे’ची आठवण करून देतात.
केळकर दांपत्य आपल्या सहकार्‍यांसमवेत मारूती मंदिर येथे उपाहारगृह चालवतात. यातून पैसा मिळवणं हा दृष्टीकोन असला तरी येणार्‍या ग्राहकांचं जेवल्यानंतरचं चेहर्‍यावरील समाधान त्यांना अधिक बळ देतं. ‘तृप्तीची ढेकर’ त्यांच्यासाठी मोलाची ठरते. ज्याच्यासाठी करायचं तो समाधानी झाला तर यशाची चव गोड लागते असं म्हणतात.
जागा लहान असली तरी सकाळ-संध्याकाळ नाष्टा अन् दोन्ही वेळचं जेवण अशी उपाहारगृहाची विभागणी सांगता येईल. शिरा, पोहे, वडा, मिसळ, इडली हे नेहमीचे नाष्ट्याचे पदार्थ इथेही आहेत. पण इडलीवडा आणि कोथिंबीर वडा हे दोन पदार्थ त्यांचं वैशिष्ट्य आहे. चवीच्या बाबतीत बोलायलाच नको. एकदा ही डीश खाल्ल्यावर परत परत खावीशी वाटेल अशी ह्याची खासियत आहे.
जे नाष्ट्याचं तेच जेवणाच्या बाबतीत. म्हणजे ‘राईस प्लेट’चा पर्याय जसा ओ तसंच पार्सल स्वरूपात पोळी भाजीही आहे. पण ‘अस्सल घरगुती’ टच त्यांनी मनापासून जपलाय. ऋतुमानानुसार मिळणार्‍या सर्व भाज्या ‘राईस प्लेट’मध्ये पहायला मिळतात. म्हणजे सर्व प्रकारच्या पालेभाज्या देताना एकाच पद्धतीत येणार नाहीत हे पाहिलं जातं. म्हणजे कधी ताकातला पालक तर कधी अळूची पातळ भाजी, कधी डाळीचं पीठ पेरून मुळ्याची भाजी असं ज्याप्रकारे घरी बनवतो तोच पायंडा त्यांनी या ठिकाणी सुरू केला. याशिवाय एकाच चवीची आमटी देण्याऐवजी कधी कढी, टोमॅटोचं सार, पिठलं असे घरगुती पदार्थ आवर्जुन हजेरी लावतात.
उन्हाळ्यात कैरीची डाळ, फणसाची भाजी, सोलकढी यांनी जेवणाची लज्जत वाढवली जाते. सणावारानुसार गोड पदार्थ तर ठरलेलेच. पुरणपोळी, मोदक, आमरस या पदार्थांना मानाचं स्थान दिलं जातं. घरी पाहुणा आल्यावर म्हणा किंवा चवीत बदल म्हणून आपण ताट सजवण्यासाठी जसं वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी ठेवणे त्याच पद्धतीने इथेही घरच्या पदार्थांना समाविष्ट केलं जातं. जेणेकरून ग्राहकाचं समाधान होईल हे पाहिलं जातं.
खाद्यपदार्थात जसा अस्सल शाकाहारी कोकणी ठसा दिसतो तोच बाणा पेयपदार्थातही जाणवतो. म्हणजे या ठिकाणी थंड पेयांमध्ये ताक, कोकम, आवळा, संत्र, सरबत आणि कैरीचं पन्ह मिळतं. पेप्सी कोकाकोलासारखी ‘क्रेझी’ पेय या ठिकाणी दिसत नाहीत. इथल्या मातीतली ही पेय आणि प्रकृतीच्यादृष्टीनेही गुणकारी हा एक दृष्टिकोन. त्याचबरोबर इथल्या उद्योगाला चालना आणि मार्केट मिळवून देण्यासाठी त्यांच्यापरीने उचललेल्या सहकार्याचा वाटा असं म्हणतात येईल. पालक आणि लहान मुलं दोघांनाही या पेयाची ‘क्रेझ’ निर्माण करणं हा जाणीवपूर्वक केलेला हा प्रयत्न नक्कीच सुखावणारा आहे. केवळ पैसा मिळवणं हे उद्दिष्ट नसून गुणवत्ता जपणं आणि आपल्याच माणसांना पुढे आणणं जसा दुहेरी हेतूही साध्य होताना दिसतो आहे.
ग्राहकदिन जपताना केळकरद्वयींनी आपल्याबरोबर काम करणार्‍या माणसांना आपल्या कुटुंबाप्रमाणे सामावून घेतलं आहे. त्यांच्यावर ठेवलेला विश्‍वास आणि त्यांच्या श्रमाची कदर त्यांनी ठेवल्यामुळेच सर्वजण मिळून हे उपाहारगृह चालवतात. वेळप्रसंगी कर्मचार्‍यांवर उपाहारगृह सोपवलं जाते. पण विश्‍वासाचं नातं इतकं दृढ आहे की शंका घेण्यास जागाच रहात नाही. आपुलकीची भावना जपल्यामुळे शिमग्याच्या काळातही हे उपाहारगृह दिवसभर सुरू ठेवणं शक्य झालं. एकमेकांची अडचण समजून घेणं हाच तर कुटुंबाचा आधार या ठिकाणी पहायला मिळतो. यामुळेच दिवसभरात ४०० हून अधिक चपात्या कराव्या लागल्या तरी चेहर्‍यावर दमल्याची छाया नसते.
राजा केळकर हे नाव कलाकार म्हणून रत्नागिरीकरांना परिचित आहे. ‘पखवाज वादक’ ही त्यांची ओळख. आजही कलेचा वारसा जपताना रत्नागिरीकरांना अस्सल घरगुती पदार्थ खिलवल्याची किमयाही त्यांनी साध्य केली आहे. यासाठी त्यांना त्यांच्या पत्नीचीही साथ लाभली. दोघंही उत्तमप्रकारे पदार्थ बनवतात अन् सर्वांना खिलवतात. घरगुती स्वरूपात पदार्थ बनवले जायचे. आता उपाहारगृह सुरू करून रत्नागिरीकरांना ‘अन्नपुर्णे’चा साक्षात्कार घडवत आहेत.
लाल तांदुळाचा मऊ भात, साजूक तूप, मेतकूट, लोणचं असा कोकणातला न्याहरीचा पायंडा पूर्वापार चालत आलेला आहे. तीच परंपरा केळकर दांपत्य या ठिकाणी सुरू करू इच्छित आहेत. पुरेसा लाल तांदूळ मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. ते शक्य झाले की न्याहारीची ही ‘कोकणी डीश’ रत्नागिरीकरांच्या सेवेत रूजू होऊ शकेल!
-संगीता करंबेळकर