Saturday, Jan 20th

Headlines:

‘वेळ तुम्ही ठरवा; शिक्षण आम्ही देऊ!’ रंगधानी आर्ट गॅलरी!

E-mail Print PDF
00_art2
00_art3
00_art5
कोकण आणि मुंबई हे नातं इतकं अतूट की मुंबईत काही झालं तरी त्याचे पडसाद कोकणात उमटतात. शिक्षण, नोकरी, व्यवसाय यासाठी तर मुंबईची वाट ठरलेलीच. मुंबईच्या मायानगरीत गेलेला सहसा परत घराची वाट धरत नाही. सणासुदीला घरी येईल पण कायमचं वास्तव्य खेडेगावात करणं दुर्मिळच. पण हे शक्य करून दाखवलंय कलाकार नीलेश शिळकर यांनी! रत्नागिरीत ‘रंगधानी आर्ट गॅलरी’ सुरू करून एक नवं दालन रत्नागिरीकरांसाठी सुरू केलं.
नीलेश शिळकर रत्नागिरीपासून ७/८ कि.मी. वर असलेल्या शीळचे रहिवासी. इयत्ता सहावीपासून मुंबईत वास्तव्य. शालेय शिक्षणानंतर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश केला आणि कलेच्या प्रांतात पाय रोवले. कला क्षेत्रात ‘गोल्ड मेडल’ मिळवून शिक्षण पूर्ण केलं. पुढे काय? हा यक्ष प्रश्‍न मात्र कलाकाराला कधीच पडत नाही. मुंबईसाखं विस्तारित क्षेत्र असतानाही ते सोडून माघारी रत्नागिरीत आले. तसं पाहिलं तर शालेय वयातच इथून बाहेर पडल्यामुळे कोणीच ओळखीचं नव्हतं. ओळख, मैत्री, नाव सर्व नव्याने सुरू करायचं होतं. पण ठरवूनच रत्नागिरीत आलेले असल्याने स्वतःची ओळख निर्माण करण्याची जिद्द होती.
ड्रॉईंगचे क्लास घेण्यापासून त्यांनी सुरूवात केली. सुट्टीच्या काळात छंदवर्ग घेतले. हळुहळू मुलांचा कल वाढायला लागला. ड्रॉईंगचे क्लास घेता घेता कलेच्या इतर प्रकारातही क्लास सुरू झाले. असं करता करता आज उद्यमनगर रोडला ‘रंगधानी आर्ट गॅलरी’ सुरू झाली. ‘वेळ तुम्ही ठरवा, शिक्षण आम्ही देऊ’ असं ब्रीदवाक्य घेऊन खर्‍या अर्थाने कलेचा प्रवास सुुरू झाला.
अगदी ३/४ वर्षे वयोगटातील मुलांपासून ते अगदी नोकरदार गृहिणींपर्यंत सर्वच जे कलेची जाणीव ठेवतात असे या आर्ट गॅलरीकडे वळतात. दिवसभर विविध प्रकारचं कलेचं शिक्षण देणं सुरूच असतं. छंद वर्गामध्ये वारली पेंटींग, मधुबनी पेटींग, कॅलिग्राफ, ड्रॉईंग स्केचिंग या प्रकारचंं शिक्षण दिलं जातं. प्रत्येक प्रकारात बेसिक आणि ऍडव्हान्स कोर्स आहे. बेसिक कोर्स १५ दिवस आणि ऍडव्हान्स कोर्ससाठी ३० दिवस. अर्थात ही कला आहे. यामुळे ठराविक कालावधीत ती बांधता येऊ शकत नाही. हे लक्षात घेऊन कागदावर जरी दिवसाचं गणित असलं तरी येणार्‍याला ती कला आत्मसात होईपर्यंत शिकवलं जातं. तासाचं बंधन नाही. वेळेचं बंधन नाही. येणार्‍याला जी वेळ सोयीची त्या वेळेत त्याने शिकावं असं मुक्त शिक्षण या आर्टगॅलरीत आहे. इथे आल्यावर कलाकाराचं मन रमतं आणि त्याच्या मनातील कल्पना चित्रातून उमटतात. तसं वातावरण मिळावं हाच तर या आर्ट गॅलरीचा उद्देश आहे.
शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, हस्तकला असेही वर्ग घेतले जातात. यामध्ये फ्री हॅण्ड ड्रॉईंग, मेमरी ड्रॉईंग, कोलार्ज याबरोबरच मातीकाम, पॉवरी पेंटींग्जही शिकवलं जातं. इथे येणारी मुलं परत जाण्याचं नाव घेत नाहीत. शेवटी अभ्यासाचं वर्ष म्हणून सक्तीने येणं कमी करण्यावर भर दिला जातो. अभ्यास प्रथम नंतर कला असं सांगण्याची वेळ येते.
एलिमेंटरी, इंटरमिजिएड ग्रेड परीक्षा २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात या ठिकाणी प्रशिक्षण घेतलेल्यांमध्ये ४ मुलं राज्यात गुणवत्ता यादीत चमकली. दोघांना ए+ ग्रेड मिळाली. दर्शन संजय डगळे ए+ ग्रेड राज्यात ३७ वा आला. कुणाल साळवी ए+ ग्रेड मिळवून राज्यात १९ वा आला. अक्षय अनंत मेस्त्री ए+ ग्रेड मिळवून ४० वा आणि मधुरा प्रशांत माचकर ए+ मिळवून १२ वी आली. याशिवाय अवनी नरेंद्र रेडीज आणि सूर्याली रविंद्र कोकरे यांना ए+ ग्रेड मिळाली.
कलेचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळत असतानाच दिवाळीच्या दरम्यान आकाशकंदील बनवायला शिकवणं, गणपतीत मूर्तीकाम असे इतर उपक्रमही घेतले जातात. यात तयार होणार्‍या वस्तू विक्रीसाठीही उपलब्ध केल्या जातात.
नीलेश शिळकर एकीकडे मुलांना शिकवताना स्वतः पेटींग्जही करत असतात. कधी कुणाच्या मागणीनुसार, कधी स्वकल्पनेतून चितारतात. कधी कुणाच्या फोटोवरून हुबेहुब पेटींग्ज बनवून देणं यासाठीही ते तयार असतात. कुणाच्या मागणीनुसार घरी जाऊन पोट्रेट तयार करणं असो किंवा संपूर्ण भिंतीवर कलाकुसर असो जे सांगाल, जसं हवय तसं देण्याची त्यांची तयारी आहे. स्वतःची कला, छंद जोपासत अर्थार्जनही आणि नवीन कलाकार घडवण्यासाठी प्रशिक्षणही असं दुहेरी काम या ‘रंगधानी आर्ट गॅलरी’तर्फे सुरू आहे.
-संगीता करंबेळकर