Tuesday, Jan 23rd

Headlines:

मराठी चित्रपटांचा सकस आविष्कार

E-mail Print PDF
shwas
katyar
natsamarat
सुमारे पंधरा वर्षापूर्वी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक नवे परिवर्तन सुरू झाले. श्‍वास या चित्रपटाने या परिवर्तनाला सुरूवात केली. अंध मुलावर शस्त्रक्रिया करण्यासाठी आणि त्याला दृष्टी मिळवून देण्यासाठी धडपडणार्‍या आजोबांची ही कहाणी अत्यंत भावस्पर्शी पद्धतीनं सादर करण्यात आलेल्या या कहाणीनं मराठी रसिकांना खिळवून ठेवलं. राष्ट्रपती पुरस्कार जिंकणारा तो दुसरा मराठी चित्रपट ठरला. पन्नास वर्षानंतर तो मान मराठी चित्रपटाला लाभला. त्यानंतर मात्र मराठीमध्ये अतिशय आशयसंपन्न चित्रपटांच्या निर्मितीची लाटच आली. त्यात वळू, टिंग्या, देऊळ हे काहीसे प्रायोगिक स्वरूपाचे आणि व्यावसायिक चित्रपटांमध्येदेखील निशाणी डावा अंगठा, कायद्याचं बोला, अगबाई अरेच्चा, शिक्षणाच्या आयचा घो, लालबाग परळ, अशा काही निवडक चित्रपटांनी वेगळी वाट चोखाळली. मराठी चित्रपट निर्मितीचा शुभारंभ करणारे आणि भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आणि चित्रनिर्मितीवर आधारित हरिश्‍चंद्राची फॅक्टरी हा चित्रपटसुद्धा अत्यंत वेगळा अन गाजलेला राष्ट्रपती पारितोषिक त्या चित्रपटालाही लाभलं. तसेच ऑस्कर पुरस्काराच्या स्पर्धेतही त्याचा सहभाग होता. गेल्या पंधरा वर्षात उमेश कुलकर्णी, परेश मोकाशी, मंगे हाडवळे यांनी मराठी चित्रपटाला नवी दिशा आणि प्रेक्षकांना मराठीकडे खेचण्याची किमया केली. मराठी चित्रपट सृष्टीला नवसंजीवनी मिळाली आहे. सध्या वर्षातला ५० च वर मराठी चित्रपटांची निर्मिती होत आहे. नवा आशय घेवून अनेक मराठी चित्रपट पुढे येत आहेत.
मराठी चित्रपट कोर्ट ऑस्करच्या जागतिक स्पर्धेत सहभागी झाला. गेल्या पंधरा वर्षात झालेला हा बदल कथा आणि पटकथा लिहिणार्‍या कथाकारांमुळे झाला आहे. तसेच नव्या शैलीचा अंगीकार करणारे ताज्या दमाचे दिग्दर्शक पुढे आले आहेत. वितरण व्यवस्था समर्थ झाली. त्यामुळे मराठी चित्रपट एकाच वेळी सर्वदूर पोहचू लागला. सध्या वर्षाला ४० ते ५० इतक्या मोठ्या प्रमाणात मराठी चित्रपटांची निर्मिती होऊ लागली आहे. मराठी चित्रपट हिंदीशी स्पर्धा करु लागला असे सुखद चित्र दिसत आहे. मराठी चित्रपटदेखील कोटीच्या कोटी घरात जाऊ लागला आहे. देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये देखील मराठी चित्रपट मानमरातबासह झळकू लागला आहे. फिल्मफेअरसारखे प्रतिष्ठेचे मानले गेलेले पुरस्कार डी. वाय. पाटील फिल्फमेअर नावाने सुरू झाले आहेत. चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित कोर्ट चित्रपटाने यंदा थेट ऑस्करच्या २०१६ साठीच्या शर्यतीत झेप घेतली. परदेशी भाषा विभागात कोर्ट भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. ऑस्करसाठी अधिकृत निवड झालेला कोर्ट हा हरिश्‍चंद्राची फॅक्टरी तिसरा मराठी चित्रपट आहे.
जानेवारी महिन्याच्या प्रारंभीच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जीवनगाथा असलेला लोकमान्य एक युगपुरूष हा चित्रपट खरं तर इतिहासपट प्रदर्शित झाला. नीना राऊत निर्मित आणि ओमकुमार राऊत दिग्दर्शित हा चित्रपट होता. एका वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून काम करणार्‍या मकरंदला लोकमान्यांच्या आवाजाची कॅसेट सापडल्याची बातमी समजते. त्या निमित्ताने टिळकांचा अभ्यास करताना टिळक साकार करण्याचा प्रयत्न या सिनेमातून केला. सुबोध भावे या प्रतिभासंपन्न अभिनेत्याने लोकमान्यांच्या भूमिकेला अगदी उत्तम न्याय दिला. सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपटाच्या पुरस्कारांचा मान मिळवविणारा, अविनाश अरूण यांनी दिग्दर्शित केलेल्या या किल्ला या चित्रपटाची देखील गौरवगाथा सांगायला हवी. या चित्रपटात आई आणि मुलाच्या अनुभवाची भावस्पर्शी गोष्ट दाखविलेली आहे. आईची कामातून बदली झाल्यानंतर एका गावात आलेल्या छोट्या चिन्मयची नव्या मित्रांशी जुळवून घेताना मानसिक हिंदोळ्याचा उभा छेद या चित्रपटातून अप्रतिम मांडलेला आहे. किल्लाने प्रेक्षकांच्या पसंतीचा आणि बॉक्स ऑफिसही गाजविलं. अलिकडच्या दशकभरात मराठी चित्रपट हा मोठ्या प्रमाणात संख्येने वाढतोय तसा तो गुणात्मक दृष्टीकोनातून देखील खूपच पुढे गेलेला दिसतो आहे. चाकोरीबद्ध विषयांच्या पलिकडे जाऊन नावीन्यपूर्ण, सकस, आशयघन आणि तांत्रिक दृष्टीकोनातून तपासता अतिशय सफाईदार अशा मराठी चित्रपटांची निर्मिती तितक्याच मोठ्या बजेटने होऊ लागलेली दिसतेय. मागच्या वर्षातला समीक्षकांनी नावाजलेला, प्रेक्षकांची प्रचंड साथ लाभलेला आणि म्हणूनच व्यवसायाच्या दृष्टीकोनातून करोडोंचे आकडे पार करणारा चित्रपट होता. मूळच्या पुरूषोत्तम दारव्हेकर लिखित, सुबोध भावेंनी दिग्दर्शन केलेला संगीत नाटकावर आधारलेला कट्यार काळजात घुसली हा सिनेमा. पंडित भानुशंकर शास्त्री आणि खॉं साहेब या दिग्गज शास्त्रीय गायकांमधली संघर्षमय संगीत गाथा या चित्रपटात दाखवलेली होती. संगीत स्पर्धेचा हा संघर्ष शेवटी एकमेकांच्या जीवनावर बेततो त्याची अत्यंत संस्मरणीय कथा या सिनेमात सुबोध भावेने तितक्याच ताकदीने मांडण्याचा अतिशय सुरेख प्रयत्न केला होता. यात शंकर महादेवन यांचा भानुशास्त्री जितका लाजवाब होता तितकाच तोलामोलाचा खॉं साहेब सचिन पिळगांवकर यांनी साकारून या भूमिकेचे अक्षरशः सोने केले.
मराठी माणसाचा गगनभेदी आवाज म्हणजे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, त्यांच्याच व्यक्तीमत्वाला साकारण्याचा प्रयत्न दिग्दर्शक अतुल काळे यांनी बाळकडू या चित्रपटात केला. मुंबईतील एका मराठी शाळेतील शिक्षकाला सतत बाळासाहेबांचा आवाज ऐकू येतो आणि त्यानंतर प्रेरणा मिळून पिचलेल्या, मराठी माणसाच्या मदतीसाठी हा नायक संघर्ष सुरू करतो. असा हा थोडा वेगळा विषय मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटाने केला आणि महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये हा चित्रपट बरा चालला. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित कॉलेजच्या मित्रांच्या मैत्रीवर आधारित क्लासमेट हा चित्रपटदेखील आपटला. जानेवारी ते जून या पूर्वार्धात अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच चित्रपट व्यावसायिक दृष्टीकोनातून सुपरहिट झालेले दिसतात.
-भालचंद्र दिवाडकर
(ज्येष्ठ पत्रकार)