Tuesday, Jan 23rd

Headlines:

गंगाराम गवाणकर-एक चमत्कार

E-mail Print PDF
gavankar
विख्यात नाटककार गंगाराम गवाणकर यांची नाट्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याची सुखद बातमी आली आणि त्यांचा सारा जीवनपट नजरेसमोर झटकन सरकला. मग चटकन मनात विचार आला की गंगाराम गवाणकर यांचं आयुष्य हा एक चमत्कार आहे. त्यांच्या जीवनात एक रंगतदार नाट्य आहे. त्यांना कोणतीही गोष्ट संघर्षाशिवाय मिळाली नाही. तेदेखील कधी हार मानून स्वस्थ बसले नाहीत. त्यांच्या हसतमुख चेहर्‍याकडे पाहिलं की, या माणसानं इतका लढा दिला असेल असे वाटत नाही. त्यांच्या वागण्या बोलण्यात मीपणा नसतो आणि कधी रडका सूर त्यांनी लावला नाही. उत्तम लोकसंग्रह त्यांनी केला. खूप मित्र जमवले. अत्यंत प्रेमाने सर्वांशी वागतात ते आपला मोठेपणा कधी आड येवू देत नाही. नाट्यसंमेनाचं अध्यक्षपद म्हणजे हमरीतुमरीवर येवून लढविलेली निवडणूक, त्यात राजकारणी डावपेच, उखाळ्यापाकाळ्या असं पडद्यामागचं नाटक असतं. पण अलिकडच्या काळात कसलाच गाजावाजा आणि वाद न होता सन्मानाने बिनविरोध अध्यक्षपदाचा मान दिला जात आहे असे गंगाराम गवाणकर हे आहेत. याचे कारण त्यांचा अजातशत्रू स्वभाव, त्यांचा लोकसंग्रह! एक दोनदाच त्यांच्याशी गाठभेट झाली. चिपळूणमध्ये नवटर्य प्रभाकर पणशीकर यांची एक जाहीर मुलाखत मी घेतली होती. त्या कार्यक्रमाला गवाणकर हजर होते. मागे कोठेतरी बसून मुलाखत मन लावून ऐकत होते. मुलाखत संपल्यावर स्वतः आले आणि पणशीकरांना अभिवादन करून माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, तू छानच घेतलीस मुलाखत! आता एकदा आपण करू असा मुलाखतीचा कार्यक्रम. मी भरुन पावलो असे दिलखुलास आहेत गवाणकर. कोकणी माणसाचा बेरकीपणा आहे तसाच चिवटपणा तर जबर आहे. म्हणून इतके चटके टोणपे खाऊन त्यांनी आपल्यातला लेखक जपला आणि त्याला सदैव ताजा तवाना ठेवला.
रत्नागिरीतले रंगकर्मी विनोद वायंगणकर यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते, गवाणकर यांचे महापुरूष पावलो हे नाटक वायंगणकर यांच्या ग्रुपने सादर केले. तेव्हा महिना दीड महिना गवाणकर नाटकांच्या तालमींसाठी रत्नागिरीत राहिले होते. त्यांच्यासाठी एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. गवाणकरांना स्वतः चमचमीत पदार्थ बनवून मित्राना खाऊ घालायची फार हौस. अधून मधून चिकन आणि मासे आणून स्वतः झणझणीत स्वयंपाक करून वायंगणकरांसह नाटकवाल्यांच्या ग्रुपला ते मसालेदार मेजवानी देत. रत्नागिरीत त्यांच्या मुलाखतीचा एक कार्यक्रमदेखील रंगला होता. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील रंगकर्मींशी त्यांची छान मैत्री आहे. स्थानिक कलावंतांना त्यांचे मार्गदर्शन लाभले याबद्दल विनोद वायंगणकर आणि त्यांचा सारा ग्रुप कृतज्ञ आहे. स्थानिक नाट्य चळवळीला चालना देण्यात त्यांचे योगदानही महत्वाचे आहे. गंगाराम गवाणकर राजापूर तालुक्यातील माडबनचे. पाचवीपर्यंत गावात शिक्षण झालं. शिकण्याची भारी आवड म्हणून आईनं उस्नं पास्नं करून त्यांना मुंबईला वडिलांकडे पाठवलं. मुंबईत आपला लेक आल्यावर वडिलांनी कपाळाला हात लावला. ह्य कित्याक इलस? असा सवाल त्यांनी केला. कारण वडलांनाच मुंबईत स्वतःचं छप्पर नव्हतं. ते एका हातात पाण्याची बादली आणि दुसर्‍या हातात किटली घेऊन चहा विकत. कुटुंबाला मनीऑर्डर पाठवत. आता लेकाच्या शिक्षणासाठी त्यांची कुतरओढ सुरू झाली. मुख्य प्रश्‍न रहायच्या जागेचा होता. अनेक दिवस मसणवटीतल्या एका इमारतीमध्ये राहून दिवस काढले. बापलेकांनी, गवाणकर आज हे सांगतात तेव्हा आपण सुन्न होतो. मॅट्रीकनंतर गवाणकर यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये ऍडमिशन घेतली. आणि कलाशिक्षण पूर्ण केलं. अतिशय अभावग्रस्त जीवन होतं. तरी त्यांची अभ्यास करण्याची आणि शिकण्याची आवड तसूभरही कमी झाली नाही. नाना प्रकारच्या खस्ता खाऊन त्यांनी अभ्यास केला. कबड्डी खेळण्यात ते वाकबगार होते. त्या खेळाच्या सामन्यात मिळालेल्या बक्षीसाच्या रक्कमेतून त्यांनी आवडती नवी कोरी पुस्तकं आणली. नव्या पुस्तकांचा वास घेत वाचता वाचता झोप केव्हा लागली ते कळलंच नाही. सकाळी  जागे झाले तर सारी पुस्तकं उंदरांनी कुरतडून पार दैना केली होती. कारण त्या कुबट खोलीत उंदरांचा सुळसुळाट होता. त्या पुस्तकांची ही दैना पाहून गवाणकरांना तेव्हा रडू आवरलं नाही. शिक्षणाचं वेड असलेले पण निराधारासारखे अभावग्रस्त आयुष्य जगणारे गवाणकर निर्धारानं शिकत राहिले. आपल्या मनात कलेचं प्रेम जोपासत आले. प्रसंगी चरितार्थासाठी ट्रकच्या मागे असलेल्या बुरी नजरवाले तेरा मुँह काला या सारख्या ग्राफिती रंगविण्याचे कामही त्यांनी केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते बेस्टमध्ये नोकरीला लागले. तेथेच त्यांचा प्रेमविवाह झाला. या नोकरीमुळे स्थिरता आली. आपण नाटककार होऊ असे त्यांना कधीच वाटले नव्हते. पण नियतीने त्यांच्या आयुष्याला हे अनपेक्षित पण रसिकांना भाग्यशाली ठरविलेले वळण दिले.
माडबनात लहानपणी देवीच्या उत्सवात चालणारी गाववाल्यांनी केलेली नाटके त्यांनी पाहिली होती. नाटक बसवताना होणारी धावपळ, गडबड गोंधळ यातली गंमत त्यांना खूप आवडायची आणि त्यात असलेलं नाट्य हेरल्यावर मनात त्यांचं बीज अंकुरलं. वस्त्रहरण नाटकाचा जन्म असा झाला. मालवणी भाषेत ते इरसाल नाटक त्यांनी लिहिलं. मच्छिंद्र कांबळी यांनी ते रंगभूमीवर आणलं. सुमारे तीस वर्षापूर्वी या नाटकाची सुरूवात यथातथाच झाली. पण एकदा पु. ल. देशपांडे यांनी पुण्यात त्यांचा प्रयोग पाहिला. पुण्यात प्रयोग म्हणून तो मराठी भाषेत केला. पु. ल. म्हणाले की, खरी मजा मालवणी भाषेतच आहे. मालवणी प्रयोग पाहू या. मग त्यांनी मालवणी प्रयोग पाहिला आणि हसून हसून मुरकुंडी वळली असं जाहीर अभिप्राय देणारं पत्र त्यांनी लिहिलं. ते पत्र प्रसिद्ध करण्याची परवानगी दिली. मग जादूच झाली. नाटक तुफान चाललं. मराठी माणसाला त्या मालवणी नाटकाचं जामच वेड लागलं. पाच हजारांहून जास्त प्रयोगाचा जागतिक विक्रम त्या नाटकाने केला आहे. गवाणकरांच्या कल्पनेतून साकारलेल्या या नाटकानं चमत्कार केला. मच्छिंद्र कांबळी यांची कारकिर्द घडविण्यात याच नाटकाचा फार मोठा वाटा आहे. गवाणकर यांनी आपली ही सारी वाटचाल माडबन ते लंडन व्हाया वस्त्रहरण या आत्मकथनपर पुस्तकात मांडली आहे. अत्यंत हृद्य असं हे आत्मचरित्र आहे.
१९६२ पासून ते नाट्य लेखन करीत आहेत. योगायोग म्हणजे त्यांच्या नाट्य लेखनाच्या सुवर्ण महोत्सवाच्या काळातच नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे. १९६२ पासून त्यांची वीस नाटके व्यावसायिक रंगभूमीवर आली आहेत. वस्त्रहरण या नाटकाचे पाच हजारांवर प्रयोग. वात्रट मेले या नाटकाचे दोन हजारांवर प्रयोग आणि वन रूम किचन या नाटकाचे एक हजारांवर प्रयोग अशी त्यांच्या नाटकाची वैभवशाली वाटचाल आहे. त्यांच्या अन्य नाटकांमध्ये वेडी माणसं, वर भेटू नका, दोघी, भोळा डँबिस, पोलीस तपास चालू आहे, वरपरीक्षा, वडाची साल पिंपळाक, चित्रांगदा, मेलो डोळा मारून गेलो आदि नाटकांचा समावेश आहे. त्यांनी एका वृत्तपत्रात व्हाया वस्त्रहरण हा तुफान लोकप्रिय झालेला कॉलम चालविला. ऐसपैस हा त्यांचा आणखी एक गाजलेला कॉलम आहे. त्यांच्या रंगभूमीवरील सेवेबद्दल नाट्यपदर्पण, नाट्य परिषद, पत्रकार संघ, कोकण कला अकादमी, प्रबोधन कलामंचतर्फे सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या वस्त्रहरण या नाटकाने मालवणी भाषा आणि संस्कृतीला जिव्हाळ्याचे स्थान आणि कमालीची लोकप्रियता मिळवून दिली. सार्‍या महाराष्ट्राला मालवणीची गोडी लागली.
मालवणी भाषेची सेवा आपल्या हातून झाली याचा त्यांना अतिशय अभिमान आहे. नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद लाभलं. त्याचं स्वागत करताना ते म्हणाले, ज्या मालवणी भाषेमुळे खळखळून हसवण्याचे आणि भरभरून खाण्याचे वेड उभ्या जगाला लावले त्या वाटेवरचा मी विनम्र साक्षीदार आहे. मालवणी भाषेला माझे कोटी कोटी प्रणाम आहेत. मायबाप प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळेच माझ्यातला लेखक आणि रंगकर्मी सदाबहार राहिला आहे. मालवणी मुलखात सोनचाफ्याच्या झाडासारख्या बहरलेल्या या लेखकानं आपल्या प्रतिभेच्या जोरदार अत्यंत समृद्ध नाट्यसृष्टी निर्माण केली आहे. त्यांचं अभिनंदन आणि उत्तम आयुरारोग्यासाठी आणि लेखनासाठी शुभेच्छा!
-भालचंद्र दिवाडकर
(ज्येष्ठ पत्रकार)