Tuesday, Jan 23rd

Headlines:

बालिका जन्माच्या स्वागतासाठी वृक्षारोपण

E-mail Print PDF
baby
राजस्थानच्या ग्रामीण भागात बालिकेचा जन्म म्हणजे शापच मानला जात असे. बालिकांची उपेक्षा आणि हेळसांड तर नित्याचीच होती. कन्या भृण हत्या सर्रास चालायच्या, त्यातच बालविवाहाची प्रथादेखील शतकानुशतके चालत आलेली. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आजही राजस्थानात ग्रामीण भागात बालविवाह हजारोंच्या संख्येने चालतात. देशभर हे भेसूर चित्र सर्वपरिचित आहे. अर्थात या कुप्रथांना पायबंद घालण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. राजेंद्रसिंह नामक जलपुरूषाने राजस्थानात वाळवंटी भागात पडणार्‍या नाममात्र पावसाचे पाणी अडवून हजारो एकर जमीन सुजलाम सुफलाम केली आणि जलक्रांती साध्य केली. तशीच आणखी एक क्रांती सुनिता शर्मा यांनी स्थापन केलेल्या स्वयंसेवी संस्थेच्या मार्फत झाली आहे. बालिका जन्म हा शाप नाही तर त्या बालिकांना सन्मानाने जगू द्या. त्यांच्या जन्माचे स्वागत करा अशी भूमिका ग्रामीण जनतेच्या मनावर ठसविण्याचे काम सुनिता शर्मा यांच्या स्वयंसेवी संस्थेने सुरू केले आहे. त्यांनी एक अभिनव उपक्रम सुरू केला. गावात हरितक्रांती घडवायची होती आणि मुलींच्या जन्माचे स्वागत करण्याची जाणीवही रूजवायची होती. म्हणून त्यांनी अनोखी शक्कल लढविली. त्यांनी बालिकेच्या जन्माच्या स्वागतासाठी वृक्षारोपण करण्याचा उपक्रम सुरू केला. राजस्थानच्या दक्षिण भागात सिरोही नावाचा जिल्हा आहे. त्या जिल्ह्यात सानवाडा नावाच्या गावापासून त्यांनी सुरूवात केली. त्या गावी बानोश्वरी नावाच्या देवीचे मंदिर आहे. त्या मंदिराच्या आवारात एक कडुनिंबाचे रोपटे त्यांनी सुगना नावाच्या मुलीच्या जन्माच्या वर्षापूर्वी लावलेल्या त्या झाडाची देखभाल सुगना आणि त्यांची आई वागटू देवी या अत्यंत आत्मीयतेने करत आल्या आहेत. त्या दोघींचे एक गहिरे नाते त्या झाडाशी जुळले आहे. आता त्या गावात बालिका जन्माला आली की तिच्या स्वागतासाठी झाड लावायचे अशी पद्धतच पडून गेली आहे. ग्रामस्थांनी त्या उपक्रमाचे स्वागत करून अंमलबजावणी सुरू केली आहे. आजुबाजूच्या अनेक गावांमध्येही त्या प्रथेचे अनुकरण सुरू झाले आहे. आपल्या मुलीचं संरक्षण केलं पाहिजे ही जाणीव त्या गावातील जनतेच्या मनात रूजवायला खूप प्रयास करावे लागले. पण आता ही सवय सर्व ग्रामस्थांना लागली आहे. सिरोही जिल्ह्यात बालिकांचे प्रमाण दर हजारी ८३० इतके म्हणजे देशात सर्वात कमी आहे. २०११ च्या जनगणनेतून हे चित्र समोर आले. अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे. म्हणून या जिल्ह्यात कन्या जन्माचे स्वागत करण्याची जाणीव निर्माण करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. आता या जिल्ह्यात प्रत्येक मंदिराच्या भोवती शेकडो झाडे लावली गेली आहेत. बालिकांच्या जन्माचा आनंद साजरा करण्यासाठी ही झाडे लावली गेली आहेत. सुगना नावाची बालिका जन्माला आल्यावर लावलेला कडुनिंबाचा वृक्ष आता तिच्याच वयाचा म्हणजे पाच वर्षाचा झाला आहे. ती दररोज न चुकता झाडापाशी येते. त्याला कवेत घेते. झाडापाशी खेळते. अशा अनेक बालिकांचे आपल्या जन्माच्या निमित्ताने लावलेल्या वृक्षांशी गहिरे भावबंध जुळले आहेत. ही जशी जन्माच्या स्वागताची कहाणी झाली तशी प्रतापगड जिल्ह्यात एक वेगळीच प्रथा आहे. तेथे आपल्या आप्तांच्या निधनानंतर त्यांची स्मृती म्हणून झाडे लावली जातात. त्या वृक्षांविषयी आत्मीयता आणि श्रद्धा बाळगली जाते. ही झाडे उत्त जोपासली जातात. रेबडी नावाची जमात या भागात राहते. ती जमात वृक्षांना देव मानणारी आहे. झाडे आपल्याला सावली देतात. फळे देतात. लाकूड मिळते. म्हणून झाडांविषयी श्रद्धा बाळगणारी ही जमात आहे. प्राचीन काळापासून भारतीय समाजात झाडे आणि माणूस यांचे गहिरे नाते आहे. आपल्या धार्मिक परंपरेतही झाडांना महत्व आहे. वृक्षांची पूजा करण्याची प्रथा आहे. हे नाते शहरीकरणामुळे लुप्त होवू लागले. कुंडीतल्या झाडापुरते ते नाते उरले आहे पण आता त्याचे भयावह अनिष्ट परिणाम जाणवू लागल्यानंतर वृक्षारोपणाला महत्व आले आहे. शोभेसाठी आणि छायाचित्र वृत्रपत्रात झळकावे यासाठी वृक्षारोपण करणारे हौशी समाजसेवक गावागावात आहेत. पण कोणीही अपेक्षा न बाळगता रोज स्वतःच्या कष्टातून झाडांची मशागत करणारा आणि नवी झाडे लावण्याचे काम करणारा एक अवलिया आसाममध्ये आहे. त्याचा अलिकडेच पद्मश्री प्रदान करून  सरकारने गौरव केला आहे. त्याने सुमारे १२५० एकर एवढ्या जागेत एकट्याने जंगल निर्माण केले आहे. गेली अनेक वर्षे या भागात तो झाडे लावतो आहे. त्याची झाडांवर अपार निष्ठा आहे. एकट्यानं धडपड करून बिया टाकून, रोपं लावून जंगल फुलवणारा असा हा देश एकटाच आहे. बाराशे एकरातील समृद्ध जंगल हे त्याच्या कष्टाचं फलित आहे.
त्याचा आदर्श समोर ठेवून अगदी शहरी मंडळींनीही बिया जमवाव्या आणि उजाड माळरानावर, डोंगरावर त्या पावसाळ्याच्या सुरूवातीला लावाव्या. या धरतीवरती हिरवी माया कायम राहिली पाहिजे. तरच मानवजातीला जीवन सुसह्य होईल.
-भालचंद्र दिवाडकर
(ज्येष्ठ पत्रकार)