Tuesday, Jan 23rd

Headlines:

पाणीवाला बाबा

E-mail Print PDF
एकट्याने डोंगर फोडून दोन गावांना जोडणारा रस्ता तयार करणार्‍या बिहारमधल्या दशरथ माझीची सत्यकथा रूपेरी पडद्यावर आली आहे. मांझीने आपल्या दिवंगत पत्नीच्या स्मरणार्थ पंचवीस वर्षे परिश्रमाची पराकाष्ठा करून हा रस्ता तयार केला. मांझीने हा रस्ता तयार करायच्या आधी दोन गावांना डोंगराला वळसा घालून ८० किलोमीटर अंतर पार करावे लागत होते. मांझीच्या रस्त्याने हेच अंतर अवघे ४ किलोमीटरचे झाले. आता राजस्थानमधल्या प्रेम सुखदास या साधूने आपल्या आईसाठी उंच डोंगराच्या दरीत एकट्याने पाणी साठवण्यासाठी बांधलेल्या धरणाच्या घटनेची माहिती प्रकाशात आली आहे.
जोधपूरपासून साठ किलोमीटर अंतरावर असलेल्या नंदियाकला हे प्रेम सुखदास यांचे गाव. या गावातल्या वाड्या डोंगराच्या कुशीतच वसलेल्या आहेत. वर्षातले बाराही महिने गावातल्या महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी रोज पाच-दहा किलोमीटरची वणवण करावी लागते. सुखदास यांच्या आईलाही हाच त्रास सहन करावा लागे. उन्हाळ्याच्या दिवसात ४५ डिग्री सेल्सियसच्या तापमानातही त्यांच्या आईला पाणी आणण्यासाठी दूरवर जावे लागे. आपल्या आईला आणि परिसरातल्या रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी होणारा हा त्रास संपवण्यासाठी डोंगराच्या कपारीत रहायला गेले. ग्रामस्थांनी त्यांना वेड्यात काढले. पण कुणाचे काही न ऐकता त्यांनी धरण बांधून पूर्ण करण्याची जिद्द बांधली.
डोंगरातच त्यांनी आपल्याला राहण्यासाठी आधी गुहा खोदली. दहा फूट उंच आणि वीस फूट लांबी-रूंदीच्या या गुहेत त्यांनी जयसियारा आश्रम सुरू केला. या गुहेतच देव-देवतांची प्रतिष्ठापना केली. देवाची पूजाअर्चा झाल्यावर छिन्नी, हातोडा आणि कुदळ घेवून ते डोंगराच्या दरीत जात असत. दगड फोडत असत. ते दगड बाजूला टाकत असत. सलग तीन वर्षे त्यांनी डोंगराच्या दरीत पाणी साठवण्यासाठी मोठा तलाव खोदला. तो खोदताना निघालेल्या दगडांचा वापर करून २०१० मध्ये छोटे धरणही बांधले. पावसाच्या पाण्याने या धरणात पाणीही साठले. पण पुढच्याच वर्षी झालेल्या मुसळधार पावसाने हे धरण फुटले आणि धरणाची भिंत वाहून गेली. तलाव कोरडा ठक पडला.
धरण फुटले आणि वाहून गेले, तरी सुखदास या अपयशाने खचले नाहीत. त्यांनी नव्या जोमाने त्याच जागेवर पक्के सिमेंट कॉंक्रीटचे धरण बांधावयाचे ठरवले. त्यासाठी दहा किलोमीटर अंतरावरच्या गावातून त्यांनी एकट्यानेच सिमेंटची पोती खांद्यावरून धरणाच्या जागेवर वाहून आणली. धरणासाठी पुन्हा दगड जमवले आणि त्यांनी साठ फूट लांबीची, तीस फूट रूंदीची आणि तेरा फूट उंचीची भिंत तलावासाठी बांधून काढली. हे धरण मजबूत आणि भक्कम झाले. धरणात पाण्याचा भरपूर साठा झाला. नांदियाकला गावासह परिसरातल्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायमचा सुटला. एकट्या साधूने बांधलेले हे भरभक्कम धरण बघण्यासाठी आजुबाजूच्या गावातलेही लोक यायला लागले.
सकाळी पूजापाठ आटोपल्यावर सुखदास यांनी पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी गावोगाव तलाव बांधावेत, अशी मोहीमच सुरू केली. मी एकट्याने तलाव आणि धरण बांधले. ग्रामस्थांनी आठवड्यातला एक दिवस श्रमदान केल्यास प्रत्येक गावात वर्षभराच्या आत तलाव बांधून पूर्ण होईल, असे ते पटवून देतात. प्यायचे पाणी मिळवून देणे हे देवाचे आणि पुण्याचे कार्य आहे.
अशी श्रद्धा असलेल्या सुखदास याचा कृतिशील आदर्श घेवून जोधपूर परिसरातल्या डोंगराळ भागातल्या काही ग्रामस्थांनी सामूहिक श्रमदानो तलाव बांधले आहेत. राजस्थानातल्या या साधूचा वॉटरमॅन असा लौकीक आहे.
-भालचंद्र दिवाडकर
(ज्येष्ठ पत्रकार)