Tuesday, Jan 23rd

Headlines:

एक प्रेरणादायक क्षण

E-mail Print PDF
hospital
श्री. विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्टतर्फे उभारण्यात आलेल्या ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या समारंभात सहभागी झालेल्या प्रत्येकालाच धन्यतेचा आणि कृतकृत्य झाल्याचा अनुभव आला असेल. कोकणातील सर्व जिल्ह्यामधून, मुंबई पुण्यातून वैद्यकीय क्षेत्रातील शेकडो कार्यकर्ते तसेच हितचिंतक उपस्थित होते. या समारंभात मान्यवर वक्त्यांच्या भाषणातून सदर संस्थेच्या गेल्या चाळीस वर्षाच्या इतिहासाचा आलेख समोर आला. महाराष्ट्राला भूषण वाटावे असे आदर्श काम तेथे उभे झाले आहे. अध्यात्मामागचा मानव कल्याणाचा उद्देश येथे मूर्तीमंत साकार झाला आहे. जे का रंजले गांजले, त्यासी म्हणजे जो आपुले, तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा असे संत तुकारामांचे वचन हेच आपल्या जीवनाचे अधिष्ठान आहे. अशा श्रद्धेने ते संप वचन आपल्या कृतीतून साकार करणारे अनेक ध्येयनिष्ठ वैद्यकीय तज्ञ आणि प्रशासन कुशल असे संचालक या संस्थेशी संपूर्णपणे एकरूप होवून काम करतात. त्यांच्या सार्‍या संकल्पाना स्वामी दिगंबरदास महाराज आणि त्यांच्या अध्यात्मिक परंपरेच्या गुरूभक्तीच्या दिव्य सामर्थ्याचे अधिष्ठान लाभले आहे. म्हणून तेथे केलेला प्रत्येक संकल्प साकार होतो आहे. स्वामी दिगंबरदास महाराज यांचे अनुयायी प.पू. काका महाराज यांच्या नेत्त्वाखाली, भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर यांचे चिरंजीव विकास वालावलकर, वैद्यकीय संचालिका डॉ. सुवर्णा पाटील, डॉ. नेताजी पाटील, डॉ. सुनिल नाडकर्णी, प्रशासकीय विभागाचे नेतृत्व करणारे श्री. गोडबोले आदीनी अविश्रांत परिश्रम करून हा प्रकल्प साकारला आहे. त्याच्या शुभारंभाच्या समारंभात सर्वच मान्यवरांनी आपल्या मनोगताद्वारे व्यक्त केलेला आनंद, समाधान आणि कृतज्ञतेची भावना कधीच विसरता येणार नाही. या भव्य समारंभात प्रमुख पाहुणे आणि महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. शेखर राजदेरकर यांचे भाषण हा या समारंभातील अत्यंत संस्मरणीय भाग होता. त्यांनी विनोद आणि चिंतन याचा सुंदर संगम आपल्या भाषणात साधला आणि वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्यापूर्वी चांगले विद्यार्थी, सुसंस्कृत आणि संस्कारांनी समृद्ध झालेला माणूस बना. तुमच्याविषयी रूग्णाच्या मनात गाढ विश्‍वास निर्माण व्हायला हवा असे तुमचे ज्ञान आणि आचरण असायला हवे आहे असे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांनी सर्वच क्षेत्रात पारंगत होण्याचा प्रयत्न करावा असे सांगताना प्रेम करणं, मारामार्‍या करणं, खेळ, नाटक, सिनेमा आणि डिबेटींग यापैकी काहीच करत नाही तर निदान अभ्यास तरी करा असं सांगितलं. तेव्हा हास्यस्फोट झाला. ते म्हणाले की तुमच्या चेहर्‍यावर कायम स्मितहास्य असायला हवे आहे. जग जिंकण्याचा तो मंत्र आहे. डॉ. राजदेकर सरांचं भाषण अत्यंत मिस्कील, खुसखुशीत आणि रंगतदार होतं. त्यांनी तीस वर्षाहून जास्त काळ वैद्यकीय क्षेत्रात अध्यापन केलं आहे. अस्सल शिक्षक आहेत आणि त्यांचं व्यक्तिमत्व बहुरंगी आहे. रसिक आणि मनस्वी गोष्टीवेल्हाळ, दिलखुलास आहेत हे त्यांच्या भाषणावरून जाणवलं.
  या समारंभात दुसरं अप्रतिम रंगलेलं भाषण होतं. दै. सागरचे संपादक नानासाहेब जोशी यांचं. त्यांनी ब्रिटनमध्ये पूर्वी वैद्यकीय सेवेला हिज मॅजेस्टीज सर्व्हिस असं सन्मानपूर्वक म्हणायचे तर नंतर त्याला डिव्हाईन सर्व्हिस म्हणजे प्रत्यक्ष देवाची सेवा अशा बहुमानदर्शक शब्दानी गौरवतात. परमेश्‍वरानं स्वतःच्या कामात मदतीसाठी डॉक्टरांना निर्माण केले आहेत असं त्यांनी सांगितलं तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यातच नानासाहेबानी एक गुगली टाकली. ते म्हणाले की डॉक्टरांची तीन रूपे असतात. पहिलं रूप असतं परमेश्‍वराचं. डॉक्टरांकडे येणार्‍या प्रत्येकाला तो परमेश्‍वरच वाटत असतो. त्या देवानं केलेल्या उपचारामुळे आपण बरे होणार असा त्यांचा विश्‍वास असतो. रोज डॉक्टर राऊंडला येतात आणि रूग्णाची चौकशी करतात तेव्हा त्याला डॉक्टर हा माणूस वाटतो आणि जेव्हा डॉक्टर बिल देतो तेव्हा तो दानव वाटतो असे ते म्हणाले. तेव्हा सारे सभागृह सात मजली हास्यात बुडून गेले. नानासाहेबांनी डेरवणच्या भूमीचा उल्लेख संतांची आणि देवाची भूमी असा केला. स्वामी समर्थांपासूनच असलेल्या गुरू परंपरेचा उल्लेख केला आणि त्या आशीर्वादाचे अमृतफळ म्हणूनच आज हा संकल्प साकार होतो आहे असे सांगितले. तेव्हा पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. स्वामी दिगंबरदास महाराजांनी या शाळादेखील नसलेल्या दुर्गम गावात सर्व प्रकारच्या शिक्षणाची, आरोग्य सेवेची सुविधा सिद्ध करण्याचा संकल्प चाणीस वर्षापूर्वी केला आणि भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर यांनी स्वामींच्या प्रेरणेने त्या कार्यात स्वतःला समर्पित केले. त्यातून रूग्णालय आणि आता सुसज्ज इस्पितळ तसेच जागतिक दर्जाचे स्टेडियम, अन्य शिक्षण संस्था उभ्या राहिल्या आहेत. याचा उल्लेख केला. या समारंभात जे चैतन्य होते, आत्मीयता होती आणि ध्येयनिष्ठा, सेवाबाव याचा जो उत्कट आविष्कार येथे दिसत होता तो सदैव प्रेयणादायी ठरेल. येथे वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण किती समृद्ध असेल याची प्रचिती आली. सुमारे चाळीस वर्षाहून अधिक काळ वैद्यकीय सेवेत व्यतीत करून नानाविध सन्मान आणि यश संपादन करणारे अनेक तज्ञ या निमित्ताने उपस्थित होते. त्यात कर्करोग तज्ञ डॉ. श्रीपाद बाणावली, डॉ. सुधीर जोशी, डॉ. अच्युत जोशी, डॉ. सुनिल नाडकर्णी, डॉ. पंकज कुलकर्णी आदींचा समावेश होता. ते सर्व वैद्यकीय तज्ञ वालावलकर रूग्णालयात नियमित सेवा देतात. हे या संस्थेचे भाग आहे. वैद्यकीय संचालिका डॉ. सुवर्णा पाटील यांनी या रूग्णालयाला विदेशी तज्ञांचे सहकार्य लाभते आहे तसेच विदेशातून विद्यार्थी संशोधनासाठी येथे येतात, दरवर्षी विदेशी डॉक्टरांची एक टीम तेथे येते असे सांगितले तेव्हा टाळ्यांचा कडकडाट करून सर्वांनी स्वागत केले. ग्रामीण भागात वैद्यकीय क्षेत्राचा ध्यास घेवून सुरू केलेल्या कामाचा हा कल्पनातीत विस्तार पाहून सर्वच विस्मय चकीत झाले.
-भालचंद्र दिवाडकर
(ज्येष्ठ पत्रकार)