Tuesday, Jan 23rd

Headlines:

किल्ले शिवछत्रपतींचे

E-mail Print PDF
raigadfort1
rajgad-fort
शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत अनेक किल्ले नव्याने बांधले गेले. फक्त सह्याद्रीतच नव्हे तर कोकण किनार्‍यावर आणि समुद्रातही किल्ले बांधण्यात आले. सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर किल्ले बांधण्यामागचे मुख्य कारण म्हणजे कोकण व देश यांना जोडणार्‍या घाटमार्गावर लक्ष ठेवणे, कर जमा करणे आणि शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवणे हे प्रमुख उद्देश होते.
शिवाजी महाराजांच्या उभ्या आयुष्यात त्यांचा संबंध कायमच गड किल्ल्यांशी येत होता. महाराजांचा जन्मदेखील शिवसनेरी या किल्ल्यावर आणि मृत्यूदेखील रायगड या किल्ल्यावरच झाला. या त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी अनेक गडकिल्ले जिंकून घेतले. महाराजांनी जास्तीत जास्त किल्ल्यांची पुनर्बांधणी केली. बरेचसे किल्ले बेवारस पडलेले होते, त्यांची दुरूस्ती करवून स्वराज्यात सामील करून घेतले.
मोहनगड या किल्ल्याच्या दुरूस्तीच्या संदर्भात महाराजांनी अफजलखान वधाच्या अंदाजे सहा महिने आधी बाजीप्रभू देशपांडे यांना पत्र लिहिले होते. पत्रामध्ये असा उल्लेख होता की, ‘मोहनगड उर्फ जासलोडगड हा हिरडस मावळमध्ये आहे, तो ओस पडला आहे, त्याची डागडुजी करून घ्यावी, तेथे २५ माणसे ठेवावीत, किल्लेदाराला घर बांधून द्यावे’ असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. सह्याद्रीतील तुंग, लोहगड, कोरिगड, यासाख्या गडकिल्ल्यांचे बांधकाम अहमदनगरची निजामशाह आणि विजापूरची आदिलशाही यांच्या काळात झाले. नंतर निजामशाहीच्या अस्तानंतर त्यांचे काही किल्ले आदिलशाहीत समाविष्ट झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठी साम्राज्याचा उदय झाल्यावर त्यांनी निजामशाही व आदिलशाहीतील अनेक किल्ले जिंकून घेतले. तसेच जे किल्ले बेवारस पडलेले होते त्यांचा स्वराज्यात समावेश केला. याच किल्ल्यांनी छत्रपतींना अनेक लढ्यांमध्ये मोलाची साथ दिली.
स्वराज्याची राजधानी
शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या लढ्याची सुरूवात करण्यापूर्वी शहाजीराजांकडे पुणे, सुपे, चाकण व इंदापूर असे चार परगणे होते. शिवाजी महाराजांनी प्रथम बारा मावळाचा प्रदेश व तेथील किल्ले घेण्यास सुरूवात केली. या दरम्यान गुंजण मावळातील राजगड हा महत्वाचा किल्ला महाराजांनी घेतला. याच किल्ल्यांची त्यांनी स्वराज्याच्या राजधानीसाठी निवड केली. राजगडावर तीन माच्या व अनेक दरवाजे बांधून घेतले. आज जेव्हा आपण या किल्ल्यांचा अभ्यास करतो तेव्हा हे कळून येते की महाराजांनी किल्ले बांधताना तेथील भूरचना व त्याचे संरक्षण या दृष्टीने असलेले महत्व याचा निश्‍चितच अभ्यास केलेला होता.
रायगड
जावळीच्या मोर्‍यांचा पराभव केल्यानंतर महाराजांनी जावळी परिसरात किल्ला बांधण्याचे निश्‍चित केले. पार या गावाजवळ भोरप्या नावाचा एक उंच डोंगर होता. मोरोपंत पिंगळे यांना त्या ठिकाणी किल्ला बांधण्याचे आदेश महाराजांनी दिले. महाराजांनी बांधलेला सर्वात उत्तम किल्ला म्हणजे रायगड. हा किल्ला बांधण्याची जबाबदारी महाराजांनी हिरोजी इंदुलकर यांना दिली होती. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे गडावर तलाव, सदर वाडे, दरवाजे, रस्ते यांचे बांधकाम हिरोजींनी केले. तसा उल्लेख रायगडावरील जगदीश्‍वर मंदिराबाहेरील शिलालेखात केलेला आहे. शांताराम विष्णू आवळसकर यांच्या पुस्तकामध्ये रायगडावरील बांधकामांची माहिती असलेला शिलालेख आहे.
या शिलालेखावरून रायगड किल्ल्यावर कोणकोणती बांधकामे केली गेली होती याची माहिती मिळते. रायगड बांधताना आणि इतर किल्ले उभे करताना महाराजांनी निश्‍चितच वेगवेगळा विचार केला असावा. कारण रायगड हे राजधानीचे ठिकाण असल्याने त्याला नैसर्गिक आणि कृत्रिम असे दोन्ही प्रकारचे संरक्षण असणे गरजेचे होते. याशिवाय तेथे सदर, अंबरखाना, कोठारे, वसाहती, मंत्र्यांचे वाडे, धार्मिक वास्तू, तलाव, मनोरे इ. बांधकामे करणे आवश्यक होते. पण इतर किल्ल्यांवर एवढ्या प्रकारच्या वास्तूंची गरज नव्हती. त्यामुणे इतर किल्ल्यांवर तेथील गरजांनुसार वास्तू उभ्या केल्या गेल्या. उदाहरणार्थ लिंगाणा, सोनगड, वासोटा, भैरवगड यासारख्या किल्ल्यांवर कैदी ठेवले जायचे. त्यामुळे तेथील वास्तू व बांधकामे भव्य नव्हती. सोनगिरी, मडागड, शिवगड, नृसिंहगड, कावळ्या हे अगदी छोटे आणि चौकी नाक्याचे किल्ले होते.
त्या परिसरातील हालचालींवर नजर ठेवायला आणि तेथील लोकांना संरक्षण देण्यासाठी हे किल्ले बांधले होते. त्यामुळे साहजिकच या किल्ल्यांवर तटबंदी व दरवाजे वगळता पक्की बांधकामे नव्हती.
वैशिष्ट्यपूर्ण जलदुर्ग
महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांमध्ये सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम हे जलदुर्गाचे होते. त्यांनी कुरटे, कासा, खांदेरी या बेटांवर अनुक्रमे सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग व खांदेरी हे किल्ले बांधले. हे किल्ले बांधत असताना त्यांच्याकडे अशा प्रकारे बेटांवर किल्ले बांधण्याचा कोणताही अनुभव नव्हता. तरी देखील त्यांनी बांधलेले किल्ले आज ३५० वर्षानंतरदेखील समुद्राशी झुंज देत उभे आहेत.
शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत बांधलेल्या किल्ल्यांची यादी सभासद बखरीमध्ये दिलेली आहे. पण त्या यादीमध्ये एकाच किल्ल्याची तीन वेगवेगळी नावे येतात. तसेच इतर ऐतिहासिक कागदपत्रातील नोंदीनुसार काही किल्ले पूर्वीच अस्तित्वात होते अशी माहिती मिळते. तरीदेखील महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत अंदाजे १०० किल्ले बांधले असण्याची शक्यता जास्त आहे. हे सर्व किल्ले बांधताना त्यांनी अवास्तव खर्च करून किल्ल्यांची उभारणी केली नाही. किल्ल्यावर ज्या ठिकाणी कातळकडे आहेत तेथे त्यांनी तटबंदी बांधलेली नाही. ज्या उतारावर किल्ला बांधायचे निश्‍चित केले त्या डोंगराच्या घळी, उतार, कातळकडे, नाळ, पाण्याच्या वाटा यांचा पुरेपूर वापर करून ते किल्ले अभेद्य बनविले. गोमुखी किंवा एडक्याच्या शिंगासारख्या आकाराच्या दरवाजाची बांधणी हे या दुर्गबांधणीचे वैशिष्ट्य ठरले.
दक्षिणेतील किल्ले
शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयादरम्यान कर्नाटक, तामिळनाडू या प्रांतातदेखील काही गड वसविले. सातारा, गोजरा या किल्ल्यांव्यतिरिक्त शाारंगगड, मदोन्मत्तगड, कृष्णगिरी असे ७९ किल्ले महाराजांनी बांधल्याचा सभासद बखरीत उल्लेख आहे. या बखरीमध्ये नोंदीप्रमाणे महाजारांच्या कारकिर्दीत त्यांनी जिंकलेले किल्ले व महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व तामिळनाडू या भागात बांधलेले किल्ले यांची संख्या २४० आहे. प्रत्यक्षात ही संख्या ३०० च्या आसपास असावी असे इतर बखरी व शिवकालीन पत्रव्यवहारावरून लक्षात येते.
शिवाजीमहाराजांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी एवढे किल्ले बांधूनही कधीही कोणत्याही किल्ल्यांवर आपले नाव लिहून ठेवले नाही. महाराजांनी नव्याने बांधलेल्या, जिंकलेल्या आणि दुरूस्त केलेल्या अनेक किल्ल्यांचा वापर जवळजवळ पुढे ५० वर्षे झाला. याच गडकिल्ल्यांच्या आधारावर मराठी साम्राज्य उभे राहिले.
-डॉ. सचिन जोशी
(लोकराज्यच्या सौजन्याने)