Tuesday, Jan 23rd

Headlines:

नशिबाने साथ दिली आता अपेक्षा आहे कर्तृत्व सिद्ध करण्याची

E-mail Print PDF
vinayak-raut
राजकारणात पुढे येण्यासाठी राजकीय पार्श्‍वभूमी, आर्थिक पाठिंबा, सामाजिक कार्य आणि किमान बर्‍यापैकी वक्तृत्व या गोष्टी आवश्यक म्हटल्या जातात. पण इतके असले म्हणजे यश नक्की असे नाही. इथे सर्वात महत्वाचा भाग असतो नशीबाचा. नशीब जोरावर असेल तर बाकी काही नसले तरी चालते. थोडक्यात सांगायचं तर नशीबाची साथ रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांना मिळाली. या नशीबाने दिलेला खासदारकीला सव्वा वर्ष उलटले आहे. पण सव्वा वर्षानंतरही त्यांनी केलेल्या कामाचा विचार करायचा झाल्यास तर ती पाटी सध्या तरी कोरीच दिसत आहे.
२००९ च्या लोकसभा निवडणुकीत सुरेश प्रभू यांच्यासारख्या उमेदवाराचा पराभव झाला. एका अभ्यासू, समाजवाद्यांच्या पसंतीला उतरलेल्या उमेदवाराचा पराभव आश्‍चर्यकारक होता. या निवडणुकीत शिवसेना सोडून कॉंग्रेसवासी झालेला नारायण राणे यांचा प्रभाव निर्णायक ठरला. त्याचा फायदा निलेश राणे या नव्या चेहर्‍याला झाला. ५ वर्षात पुलाखालून बरेच पाण गेले. कॉंग्र्रेसला ग्रहण लागले. राणेंचा प्रभाव ओसरला गेला. अशा वेळी प्रभूनी लढाईच्या आधीच शस्त्र टाकली आणि राऊतांचे नशीब फळफळले. खरतर हे राऊत तेव्हा सर्वसामान्य मतदाराला काय शिवसैनिकांनाही ठाऊक नव्हते. पण राणेंच्या सोबत त्यांचे समर्थक शिवसेनेतून निघून गेल्यावर निर्माण झालेली पोकळी त्यांच्या फायद्याची ठरली. शिवसेनेत ते सचिव झाले.
पक्षाचे पदाधिकारी होणे वेगळे आणि निवडणुकीसाठी उमेदवार ठरणे वेगळे. कारण राऊत यांच्याकडे लोकनेते होण्यासाठी आवश्यक असलेले नेतृत्वगुण दिसलेले नव्हते. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय इतकीच त्यांची ओळख होती. मात्र त्यामुळेच त्यांच्या नावाला विरोध करण्याचे धाडस कुणी केले नाही हेही तितकेच खरे. तरीही दोन वेळा मुंबईतून मनपा निवडणुकीत ते पराभूत झाल्याने त्यांची डाळ इथे कितपत शिजेल याबाबत साशंकता होतीच. राऊतांनी मतदार संघात संपर्क सुरू केला. राणेंना विरोध वाढला होता. मोदींची जादू पसरली होती आणि उद्धव ठाकरेंची कृपादृष्टी झाली होती. या सर्वांचा परिणाम म्हणून शिवसेनेचे राऊत नाम नाणे नुसते चालले नाही तर चांगलेच धावले.
राऊतांना खासदारकीचा टिळा लागला. शिवसेना पक्षात कार्यकर्त्याचा केव्हाही नेता होवू शकतो. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. राऊताना निव्वळ शिवसेनेची आणि तेव्हा पर्यंत मित्रपक्ष असलेल्या भाजपचीच मते मिळाली असे नव्हे तर मतदारसंघातले राणे विरोधक सर्वपक्षीय एकवटले. त्यांनी राऊतांना कौल दिला. एक शांत, संयमी व्यक्ती म्हणून त्यांना पसंती मिळाली. इथपर्यंतचा राऊतांचाा प्रवास नशिबाच्या जोरावर पार पडला. खरंतर रत्नागिरी-सिंधुदुर्गात शिवसेनेच्या उमेदवारांना उमेदवारी मिळाल्यावर फार काही करावे लागत नाही. सर्वसामान्य शिवसैनिकच पुढचे काम पार पाडतो. अनंत गीते, सुरेश प्रभू यांच्यावरही नशीब वारंवार मेहरबान राहिले होते. नशीब इतके जोरावर राहिले की तुल्यबळ प्रतिस्पर्धीही त्यांना लाभला नाही. पण राजकारणात सगळेच दिवस सारखे नसतात हे या दोघांनीही अनुभवले. गतवर्षीच्या निवडणुकीत गीते थोडक्यात जिंकले तर या आधीच्या निवडणुकीत प्रभूना पराभव पत्करावा लागला. तात्पर्य काय तर नशीब केव्हाही बदलू शकते याचे भान खा. राऊताना राखावे लागणार आहे.
साधारणपणे नव्या खासदाराला काम शिकण्यासाठी काही कालावधी जावा लागतो. पण हा कालावधी सहा-आठ महिन्यांपेक्षा अधिक असता तर मात्र ते निराशाजनक ठरते. सव्वा वर्षानंतर खा. राऊतांनी काय काम केले, असा सवाल समोर आल्यावर त्यांचा आलेख खालीच दिसतो. अशाच गतीने त्यांनी काम केले तर पुढच्या निवडणुकीत ते ५ वर्षे जूने म्हणून त्यांचा विचार होईल. पण स्वतःला सिद्ध करण्याची संधी ते गमावतील. त्यातच मोदीज्वर कमी होवू लागला आहे. युतीतला बेबनाव वाढतच चालला आहे. अशा स्थितीत प्रतिस्पर्ध्यांनी आपली ताकद वाढवली तर आणखी चार वर्षानी राऊत यांचे नशीब किती साथ देईल अशी साशंकता निर्माण होवू शकते.
राजकारणात आणखी चार वर्षानी काय होईल हे आजच सांगता येणार नाही. तेव्हाच्या राजकीय स्थितीचा अंदाज आज देता येणार नाही. पण निव्वळ नशिबावरच अवलंबून नेहमी राजकारणात जिंकता येत नाही. त्यासाठी कर्तृत्वही सिद्ध करावं लागणार आहे. ते सिद्ध करता आले नाही तर नशीब केव्हाही नाराज होऊ शकते.
-राजेश मयेकर
ज्येष्ठ पत्रकार