Saturday, Jan 20th

Headlines:

मला भीती वाटते समाजाची...

E-mail Print PDF
shraddha-kalambate
पावसाळी ढगाळ वातावरण जी.जी.पी.एस. हायस्कूलचे मोकळे प्रवेशद्वार. समोरच्या मोठ्या पटांगणात निळ्या छताखाली प्रेक्षकांसाठी केलेली बैठक व्यवस्था. आकाशात हळुहळू काळ्या ढगांची गर्दी. तशीच आवर्जून उपस्थित असलेल्या शेकडो प्रेक्षकांच्या अंतर्मनात उठलेलं असंख्य विचाराचं काहूर ....
अशा पावसात तेही निळ्या आसमंताखाली बसून पहावा असा कोणता बरं हा प्रयोग? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोचलेली. मला तर एकदम मुंबईच्या ‘ओपन थिएटर’ची आठवण झाली. इतक्यात पावसाची रिमझिम सुरु झाली. प्रेक्षकांनी बसल्या बसल्या जागेवरच छत्र्या उघडल्या. बघता बघता जोरदार बरसात सुरु झाली. प्रेक्षकांनी प्रवेशद्वाराच्या व्हरांड्यात आडोसा घेतला. २०-२५ मिनिटे संततधार सुरु होती. मात्र आयोजक व प्रेक्षक यांच्या मनातील प्रयोग पाहण्याचा स्फुलिंग विझत चालला होता. परंतु दुर्दम्य इच्छाशक्तीचा एक किरण ‘प्रयोग होणारच’ अशी ग्वाही देत होता. आणि झालंही तसंच...
साचलेला दुःखावेग ओसरताच आकाश निरभ्र झालं. प्रेक्षक पुन्हा आसनस्थ झाले आणि प्रयोगाला सुरुवात झाली. ‘नमस्कार, मी संजय हळदीकर.... तुम्ही हे नाव ओळखलं असेलच. महाराष्ट्रातील आश्रमशाळा, अनाथालये, वसतिगृहे, बालगृहे, निरीक्षणगृहे यातील मुलांमध्ये मिसळून त्यांच्याशी सुसंवाद साधून कथा, कविता, नाट्य चित्रकला, अभिनय इ. च्या माध्यमातून उपेक्षित, निराधार पिडित मुलांना बोलतं करणारे, त्यांच्या नीरस, रुक्ष जीवनात आनंदाचे, हास्याचे, करमणुकीचे विश्‍व निर्माण करणारे सुप्रसिद्ध स्टेज आर्टिस्ट संजय हळदीकर...
अनाथालयातील मुलांनी लिहिलेल्या ‘भीती’ या विषयावरच्या हळदीकर यांनी संकलित केलेल्या कवितांचा संग्रह म्हणजे ‘भीती आणि भिंती’ यावर आधारित दीर्घांक सादर केला होता रमेश कीर कला ऍकॅडमीच्या मुलांनी आणि त्याची निर्मिती, दिग्दर्शन व हळदीकर साकारले होते ऍकॅडमीचे विभागप्रमुख प्रदीप शिवगण यांनी.
अनाथालय, बालगृहातील मुलांचे जीवन तिथला कर्मचारीवर्ग, (कुठे मुलांच्या भावविश्‍वाशी समरस होणारे माऊली, तर कुठे मुलांच्या वाट्याला आलेल्या उपेक्षित संस्कारशून्य जीवनाचा तिरस्कार करणारे काही) तिथलं रुक्ष, चाकोरीबद्ध, जीवन, मुलांच्या व्यथा, समस्या त्यांचे प्रश्‍न प्रदीप शिवगण यांनी या दीर्घांकामध्ये मांडण्याचा पुरेपूर प्रामाणिक प्रयत्न केला होता. यात जी.जी.पी.एस. च्या १९ मुलांनी तर ऍकॅडमीच्या ८ मुलांनी सहभाग घेतला होता. उर्वरित १५ कलाकार रंगमंचामागची सर्व व्यवस्था हाताळत होते. पावसाच्या पाण्याने चिपचिपीत झालेल्या फरशीवर प्रयोग सादर करणं ही खरोखरच जिकीरीची गोष्ट होती. परंतु हे आव्हान अजिबात विचलीत न होता बालकलाकारांनी लिलया पेललं. त्याबद्दल प्रेक्षकांनी त्याचं कौतुक तर केलचं परंतु हा प्रयोग सर्व बालगृहातून तसेच समाजासमोरही यायला हवा अशी मागणीही करण्यात आली.
वाचकहो, हा प्रयोग म्हणजे केवळ मनोरंजन नव्हते. यातून आपल्याला सामाजिक बांधिलकी म्हणून बरंच काही घेण्यासारखं, करण्यासारखं आहे. ज्यामुळे या मुलाचं जीणं थोडफार सुसह्य होऊ शकेल. या मुलांनी त्यांच्या आयुष्यातील जपलेलं वास्तवाचं भान त्यांच्याच शब्दात-
‘मला माझ्या आयुष्याची भीती वाटते
यश मिळवण्यासाठी
‘मला माझ्या समाजाची भीती वाटते
मला माझ्या गरीबीचीही भीती वाटते’
‘मला भीती वाटते सरांची
शाळेला जायची इच्छा आहे
पण शाळेत घेत नाहीत
माझा दाखला नाही’
‘भीती वाटते मला राजकारणी लोकांची
कधी कुणा गरीबाला ते चिरडून टाकतील’ इ.

हळदीकर सरांनी पाहिलेलं स्वप्न या पुस्तकाच्या रुपाने प्रदीप शिवगण यांच्या अंतःकरणाला भिडलं आणि या दीर्घांकाच्या माध्यमातून त्यांनी ते समाजासमोर मांडलं. आजकालच्या सासू-सुनांच्या टिपिकल मालिका, प्रेमाचे त्रिकोण, कर्कश, बिभत्स रिऍलिटी शोज्‌च्या जमान्यात एका तरुणाने उपेक्षित, अनाथ निराधार मुलांच्या भावविश्‍वावर कलाकृती सादर करणं यातच त्याचं वेगळेपण सामावलेलं आहे. हे वेगळेपण त्यांनी असंच जपावं याकरता त्यांना हार्दिक शुभेच्छा! तसेच सामाजिक बांधिलकीची जाणीव असणार्‍यांनी, जपणार्‍यांनी, हळदीकराचं ‘भीती आणि भिंती’ आवर्जून वाचावं.
-श्रद्धा कळंबटे