Tuesday, Jan 23rd

Headlines:

प्र. ल. मयेकर ः अष्टपैलू नाटककार

E-mail Print PDF
prabhakar-mayekar
मराठी रंगभूमीवर अनेकरंगी यशस्वी नाटकांची आरास मांडणारे गाजलेले नाटककार प्रभाकर लक्ष्मण मयेकर यांच्या निधनाच्या बातमीनं रसिक प्रेक्षक हळहळत आहेत. मयेकर रत्नागिरीचे सुपुत्र होते. निवृत्तीनंतरच्या काळात ते रत्नागिरी येथेच रहात होते. पण कर्करोगाने ग्रासल्यानंतर उपचारासाठी म्हणून ते मुंबईत आपल्या मुलीच्या घरी रहात होते. तेथेच त्यांनी अंतिम श्‍वास घेतला. मयेकर सिद्धहस्त नाटककारहोते. एकांकिका लिहिण्यापासून त्यांनी सुरूवात केली आणि नंतर नाट्यलेखनात रमले. त्यांनी दर्जेदार कथालेखनही केले आहे. त्यांच्या प्रतिभेला अनेक पैलू होते. यामुळे त्यांनी सामाजिक वास्तववादी, कौटुंबिक, रहस्यमय, विनोदी आणि थ्रिलर अशी सर्वच प्रकारची नाटके त्यांनी लिहिली. सुमारे तीस वर्षे ते रंगभूमीवर कार्यरत होते. प्रारंभी हौशी आणि कामगार रंगभूमीवर सुमारे एक दशक ते वावरले. नंतर ते व्यावसायिक रंगभूमीवर आले. ४ एप्रिल १९४६ रोजी त्यांचा जन्म झाला. शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते बेस्ट कंपनीत कामाला लागले. त्यांना लेखनाची आवड मात्र शालेय जीवनापासूनच होती. मसीहा हा त्यांचा कथासंग्रह १९७८ मध्ये प्रसिद्ध झाला. प्रारंभीच्या काळात त्यांनी एकांकिका लिहिल्या. त्यात कळसूत्र, अतिथी, रक्तप्रपात या एकांकिकांचा समावेश आहे. १९८५ च्या सुमारास त्यांचं अथ मनुस जगनं हे नाटक गाजलं. या नाटकातून त्यांनी मानवी स्वभावातील क्रौर्य आणि आक्रमकता यांचा शोध घेतला. आदिवासी आणि प्रगत समाजला जाणारा समाज यांच्यातील संघर्ष त्यांनी रंगवला. आदिवासीना समजून घेणारी भाषा तयार व्हायला पाहिजे हे सूत्र त्यांनी मांडले. प्रायोगिक रंगभूमीवर ते नाटक गाजले होते. नंतर मयेकर व्यावसायिक रंगभूमीकडे वळले. अनेक दमदार आणि गाजलेली नाटके त्यांनी चंद्रलेगा या प्रसिद्ध संस्थेमार्फत सादर केली. अग्निपंख हे कौटुंबिक नाटक. मा अस साब्रिन, रातराणी, पांडगो इलो रे बा इलो, दीपस्तंभ ही त्यांची गाजलेली इतर नाटके होती. रमले मी, तक्षकयाग, गंध निशिगंधाचा ही आणखी काही व्यावसायिक नाटके त्यांनी लिहिली. मच्छिंद्र कांबळी यांच्या भद्रकाली संस्थेने त्यांचे पांडगो हे धमाल नाटक गाजविले. चंद्रलेखा या संस्थेने त्यांची नाटके सादर केली. हसू आणि आसू तसेच गोडीगुलाबी ही आणखी काही नाटके त्यांनी रंगविली. त्यांची सर्वाधिक नाटके चंद्रलेखानेच सादर कली. त्यांच्या अनेक नाटकांचे महोत्सवी प्रयोग झाले. वसंत कानेटकर, मधुसूदन कालेलकर यांच्यानंतरच रंगभूमीवरचा एक आघाडीचा यशस्वी नाटककार म्हणून त्यांचा आवर्जून उल्लेख केला जातो. त्यांच्या भाषा प्रभुत्वाची विशेष चर्चा होत असे. प्रभावी व्यक्तिचित्रण, मोजक्या शब्दात अत्यंत मार्मिक संवाद लेखन, नाट्य फुलविण्याची कुशलता आणि बांधेसूद अशी नाट्यकथा यामुळे रसिकांनी त्यांच्या नाटकांना नेहमीच पसंतीची पावती दिली. प्र. ल. मयेकर स्पष्टवक्ते आणि अत्यंत शिस्तीत लेखन करणारे होते. त्यांच्या गोष्टीवेल्हाळ आणि आत्मीयतेविषयी अनेकजण सांगतात. रत्नागिरीमध्ये निवृत्तीनंतर ते राहिले होते. तेथे रमले होते. त्यांच्यामुळे रत्नागिरीतील साहित्य विश्‍वात चैतन्य निर्माण झाले होते, कोमसापच्या अनेक उपक्रमांमध्ये ते आनंदाने सहभागी होत असत. नवोदित साहित्यिकांशी गप्पा मारण्यात रमून जात. एक सच्चा माणूस आणि अष्टपैलू नाटककार हरपला याची खंत आहे. त्यांनी सुमारे दोन दशके रंगभूमीची आपल्या गुणवंत कलाकृतींच्या माध्यमातून जी सेवा केली तिची नोंद रंगभूमीच्या इतिहासात कायमची राहील.
-भालचंद्र दिवाडकर
(ज्येष्ठ पत्रकार)